जळगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मास्क वापरणे बंधनकारक आहे. कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी झाली असली तरी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. मात्र जळगाव शहरात मास्क न वापरता सर्रासपणे वावर सुरु असल्याचे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सकाळी सुभाष चौकात आणि दुपारी टॉवर चौकात मास्क न वापरणार्या 115 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. मनपा,पोलीस कर्मचार्यांसह नागरिकांकडून प्रत्येकी दंड वसूल केला. दरम्यान,कारवाईच्यावेळी नियम तोडण्यात शासकीय कर्मचारीच अग्रेसर असल्याचे दिसून आले.
उपायुक्त संतोष वाहुळेंनी केली कारवाई
कोरोनाच्या संकटामुळे तब्बल सात महिने जनजीवन विस्कळीत झाले. आता रुग्ण संख्या कमी झाली असली तरी कोरोना संसर्गाची भीती प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यामुळे शासन स्तरावरुन नियमांचे पालन करत उपाययोजना आणि खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातच मास्कचा वापर अनिवार्य आहे. विना मास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहे. तरीही देखील शहरात काही नागरिक मास्क न वापरता सर्रासपणे शहरात दिसून येत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाच्यावतीने उपायुक्त संतोष वाहुळे यांनी कारवाईचा बडगा उगारला.
प्रत्येकी 200 रुपये दंड वसूल
शहरात मास्क न वापरणायांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण निमुर्लन विभागातील इस्माईल शेख,संजय ठाकूर,किशोर सोनवणे व पथकाने सकाळी सुभाष चौकात तर दुपारी टॉवर चौकात दंडात्मक कारवाई केली. नागरिकांसह महानगरपालिकेचे चार कर्मचारी,चार पोलीस कर्मचार्यांवर देखील कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाचे शासकीय वाहन,मनपाच्या तीन घंडागाड्यावरील चालकांवरही कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांवरही कारवाई
मनपा प्रशासनाच्यावतीने मास्क न वापरणांर्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कारवाई केली जात आहे. पान,गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी काही जण थुंकतांना दिसून आले. त्यामुळे थुंकणार्यांकडून देखील प्रत्येकी 200 रुपये दंड वसूल केल्याची माहिती मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.
फुले मार्केटमधील 40 हॉकर्सचे साहित्य जप्त
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केटमध्ये मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण निमुर्लन विभागातर्फे कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यावेळी 40 हॉकर्सवर कारवाई करुन त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान,मनपाचे पथक आणि हॉकर्स यांच्यात वाद झाला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.