नियम पाळून संस्कृतीकडे वळल्यास समाजाचा विकास

0

महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे सचिव चंद्रकांत चौधरी : पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात भूगोल सप्ताहाचे उद्घाटन

भुसावळ– समाज घडवणारी, व्यक्तिमत्व घडवणारी भूगोल ही महत्वाची शाखा आहे. पर्यावरणाचा र्‍हास दिवसेंदिवस होत आहे आणि या सर्वांचा वाईट परपरीणाम मानवी जीवनावर कसा होतो याची शिकवण भूगोल सप्ताहातून विद्यार्थ्यांना होते. आज समाजामध्ये मनुष्य विकृतीकडे वळत आहे,जर त्याने प्रकृतीच्या नियमांचे पालन केले आणि तो संस्कृतीकडे वळला तर समाजाचा सर्वांगीण विकास कोणीही रोखू शकत नाही, असे विचार महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे सचिव चंद्रकांत चौधरी यांनी येथे केले. कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात भूगोलशास्त्र मंडळ आयोजित भूगोल सप्ताहाचे उद्घाटन मंगळवारी झाले. याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

सामाजिक भान ठेऊन करा व्यक्तिमत्वाचा विकास
चौधरी पुढे म्हणाले की, समाजाचा विकास व्हायचा असेल तर समाजातील प्रत्येक स्तरातील घटकाचा विकास व्हायला पाहिजे. भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेऊन व्यक्तिमत्वाचा विकास करावा. जेणेकरून त्याचा फायदा महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना देखील होऊ शकतो. प्रसंगी उद्घाटक म्हणून उमवि अधिसभा सदस्य प्रा.ई.जी.नेहेते होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे होते.

अंर्तमनाच्या ध्यासातून प्रगती
उद्घाटक प्रा.नेहेते म्हणाले की, अंर्तमनातून कोणत्याही गोष्टींचा ध्यास घेतला की प्रगती ही होतेच म्हणजेच आपण एखादी गोष्ट मनापासून करा की, आपली प्रगती कोणीही रोखू शकत नाही. भूगोलाच्या विद्यार्थ्याने तर अतिशय जिज्ञासु वृत्तीने प्रगती करून अंतर्मनातून हाक घेतली पाहिजे.