नियोजनाअभावी वाडीवर पाणी टंचाईचे सावट

0

वाडी । शिरपूर तालुक्यातील वाडी बु गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. मार्च महिन्यापासून गावात पाणी टंचाई भासवू लागली होती. ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावाला चार दिवसा आड पाणी पुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शासनाने वाडीसाठी 32 लाख रुपयांचा निधी दिला होता. परंतु तत्कालीन ग्रामसेवक देवरे यांच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे काही निधी खिशात तर काही असाच पाण्यात गेला असल्याची चर्चा गावांत होत आहे. लाखो रूपये खर्च करून पाणी साठवणुकीसाठी पाण्याची टाकी उभारली. मात्र टाकीचे काम नित्कृष्ट केल्याने टाकीत पाणी टाकताच टाकीला गळती लागून जीर्ण झालेली टाकी पडायला आली होती. आज त्या टाकीचा फक्त सांगाळा उभा आहे.

गावासाठी केवळ एक ट्युबवेल
ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून नदी काठावर विहीर खोदून गावाला पाणीपुरवठा सुरु केला होता. परंतु काही काळानंतर त्या विहिरीचे पाणी दूषित होऊ लागल्यामुळे विहीर बंद करण्यात आली. त्यामुळे नदी काठी विहीर खोदली पण ती ही निरुपयोगी ठरली आहे. दलित वस्तीत असलेला ट्युबवेल सुरु होती. त्यामुळे अनेक लोकांचा पाणी प्रश्न सुटत होता. परंतु त्या ट्युबवेलची मोटार जाळल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने मोटार दुरुस्त न करता तो ट्युबवेल व पाण्याची टाकी बंद करून टाकली. परिणामी सध्या स्थितीत एकच बोरवेलने संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होत असल्याने पुरेशे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनाअभावी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय गंभीर होत चालली असून नागरिकांना चार दिवस आड पिण्याचे पाणी मिळत आहे. तर अनेक नागरिकांना शेत,माळ्यातून बैल गाडी, वाहनांच्या सहाय्याने पाणी आणावे लागत आहे.