शिरपूर। शिरपूर तालुक्यातील अनेक गांवामध्ये पाणी टंचाई भासत आहे. तालुक्यातील गावांमधील पाणी टंचाई जाणून घेण्यासाठी आमदार काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली शिरपूर पंचायत समितीच्या सभागृहात सरपंच व ग्रामसेवकांची बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार महेश शेलार,सभापती रूलाबाई पवार, उपसभापती संजय पाटील, गटविकास अधिकारी एम.डी. बागुल, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता एम.डी.पाटील, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता व्ही. एस. पाटील,सी.पी. धाकड, गटशिक्षणाधिकारी पी.झेड. रणदिवे, नारायण पवार आदी उपस्थित होते. या बैठकीत बोटावर मोजण्याएवढ्याच पं.स सदस्य, सरपंच, पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती.
आदिवासी भागात भीषण स्थिती
खैरकुटी या गावात सध्या 8 दिवसातून पाणी दिले जात आहे. हयाच ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शेमल्या,कोळशापाणी,लालबर्डी येथेदेखील पाणी टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे या पाड्यांवर विहिर अधिग्रहण, पाईपलाईन व हातपंप बसविण्याची मागणी करण्यात आली. तर झेंडेअंजन अंतर्गत रतनपाडा येथे बोअरची मागणी करण्यात आली. निमझरी या गावात बोअरवेलचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. विहीर खोलीकरण केल्यास पाणी टंचाई दुर करता येणार आहे, त्यासाठी निधीची मागणी करण्यात आली. जुने भामपूर येथे गावापासुन 3 किमी अंतरावरून पाईपलाईन टाकून पाणी आणण्यात आले होते, मात्र सध्या पाईपलाईन नादुरूस्त असल्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जळोद अंतर्गत अंबाफाटा येथे खोलवर पाणी गेल्यामुळे विहीर खोलीकरणची मागणी करण्यात आली. हातपंप बंद अवस्थेत आहेत. तसेच धरमपाडा येथे खाजगी विहिर अधिग्रहण करून पाईपलाईन करण्याची मागणी करण्यात आली. बुडकीविहिर येथे विहिर खोलीकरण केल्यानंतर पाणी टंचाईचे सावट दुर करता येईल असे सागण्यात आले. गुर्हाळपाणी अंतर्गत असलेल्या प्रधानदवेी पाड्यापर्यंत गाडी पोहचत नसल्यामुळे तेथे तातडीने विंधनविहिर करण्यसाची मागणी करण्यात आली, तर फत्तेपूर अंतर्गत हिंगण्यापाडा येथील हातपंप आटला आहे.
नियोजन अभावी टंचाई : आ.काशिराम पावरा
आ.पावरा म्हणाले की, केवळ पाण्याच्या नियोजनाअभावी प्रत्येक गाव व पाड्यावर पाणी टंचाई भासत आहे. विहिर अधिग्रहण केलेल्या लोकांना पैसे मिळाले नाही. ते लोक स्वत:च्या पिकांना पाणी कमी करून गावासाठी पाणी पुरवित असतांना अशा लोकांना शासनाच्या नियमाप्रमाणे निधी दिला पाहिजे. भविष्यात पाणी टंचाई भासण्यापुर्वीच गावतलाव करण्याची योजना आखली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर सरपंच यांनी ग्रामसेवकांना सोबत घेवून पाण्याचे नियोजन करावे.
तातडीने उपाययोजना आखाव्या : तहसीलदार
तहसीलदार शेलार यावेळी म्हणाले की, वातावरणातील बदलामुळे काही भागात पाणी टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे आतापर्यंत 3 नवीन विंधनविहिर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. पाणी टंचाई संदर्भातले संवदेनशील गावे पाहून तेथे तातडीने उपाय योजना आखल्या पाहिजेत. तात्पुरत्या स्वरूपाच्या योजना आखून 2 महिन्यात विहिरी कशा रिचार्ज करता येतील याचा प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने तलाठ्यांशी संपर्क साधून सरकारी जागेत गाव तलाव करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावे. विहिर अधिग्रहणाच्या प्रस्तावास 24 तासाच्या आत परवानगी देण्यात येईल, असे ते म्हणाले.