नियोजन अन् समन्वयाने जल शक्ती अभियान यशस्वी करा

0


सह सचिव संजय कुमार सिन्हा यांचे आवाहन

जळगाव, – रावेर आणि यावल तालुक्यातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आप-आपसात समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे. तसेच गावपातळीपर्यंत हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सांघिकपणे काम करावे. या कामासाठी पुरेसा निधी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे योग्य पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन मानव संसाधन विकास विभागाचे सह सचिव तथा जल शक्ती अभियानाचे केंद्रीय नोडल अधिकारी संजय कुमार सिन्हा यांनी केले.
जिल्ह्यातील यावल आणि रावेर तालुक्यात ‘जल शक्ति अभियान’ दिनांक १ जुलै पासून कार्यान्वीत झालेले आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, माजीमंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, प्रभारी जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन .पाटील, यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक प्रकाश मोराणकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता आनंद मोरे, जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर, निवृत्त अधिक्षक अभियंता व्ही. डी. पाटील, फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे, जि. प. चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


अभियानाने दुष्काळावर मात

सह सचिव सिन्हा पुढे म्हणाले की, जल शक्ति अभियानास शासनाकडून मिळणार्‍या निधीचा योग्यप्रकारे व विहित मुदतीत विनियोग केल्यास हे अभियान पुर्णपणे यशस्वी होईल. त्याचप्रमाणे या अभियानाचा लाभ सर्वांना होवून खर्‍या अर्थाने दुष्काळावर मात करता येईल. किंबहुना दुष्काळच नसेल अशी आशादायक परिस्थती निर्माण होवू शकते. यावेळी आमदार खडसे यांनी सह सचिव सिन्हा यांना येथील भौगोलिक परिस्थितीची माहिती देवून या योजनेची तत्कालीन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी पाहणी करून प्रशंसा केल्याचेही सांगितले. खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, निवृत्त अधिक्षक अभियंता व्ही.डी.पाटील यांनी केंद्रीय सचिवांना या योजनेत येणार्‍या तांत्रीक अडचणींची माहिती देवून आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. प्रारंभी कृषि विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांनी उपस्थितांना स्लाईड शोच्या माध्यमातून या उपक्रमाची माहिती दिली.