मुंबई । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार नारायण राणे यांना प्रदेश कोंग्रेसने धोरणात्मक नियोजन कमिटीतुन डावलले आहे. राणे हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी राणे यांना या कमिटीतुन डावलले असल्याची चर्चा ऐकयला मिळत आहे. आमदार राणे हे भाजपा मध्ये जाणार म्हणून गेले कित्येक दिवस राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भाजपची जाहीर स्तुती
गेले काही दिवस राणे आणि भाजपा नेत्यांचे सख्य वाढले आहे.ते जाहीर पणे भाजपा नेत्यांची स्तुती करीत आहेत.तर त्यांनी अनेक वेळा काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली आहे. ही बाब खटकल्याने या समितीतून राणे यांना संधी दिली नसल्याचे समजते. ही समिती नुकतीच जाहीर झाली आहे.
विखे, दलवाई, भाई जगतापांची वर्णी
या समितीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासहित राधाकृष्ण विखे पाटील, हुसेन दलवाई, भाई जगताप, शरद रणपिसे इत्यादी नेते आहेत.पण या समितीत राणे यांचा विचार केलेला नाही. आमदार नितेश राणेंच्या परखड वागणुकीचाही फटका नारायण राणे यांना बसला असल्याचे बोलले जाते. त्यांनीही पक्षातील बऱ्याच नेत्यांना दुखावले असून, इतर पक्षातील चर्चेबाबत जाहीर वक्तव्ये केली, ती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचवण्यात आल्याचे बोलले जाते.