नियोजित मेट्रो स्थानकाला ‘इन्फोसिस’चे नाव!

0

पिंपरी-चिंचवड। आयटीयन्ससाठी उभारण्यात येणार्‍या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गावरील इन्फोसिस चौकातील स्थानकास इन्फोसिस कंपनीचे नाव देण्याचा प्रस्ताव ‘पीएमआरडीए’कडून इन्फोसिस कंपनीला देण्यात आला होता. त्या प्रस्तावाला इन्फोसिस कंपनीने सहमती दर्शवली असून, या बदल्यात इन्फोसिस कंपनी त्या स्थानकांची निर्मिती करणार आहे.

‘पीएमआरडीए’कडे जबाबदारी
हिंजवडी येथे रोजगारासाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या मोठी असली, तरी त्यांच्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध झालेला नाही. त्यादृष्टीने, शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्प विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. सार्वजनिक-खासगी सहभागातून (पीपीपी) हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याची सर्व जबाबदारी ‘पीएमआरडीए’कडे सोपविण्यात आली आहे.

निधी उभारण्यासाठी पर्याय
‘पीएमआरडीए’ने काही महिन्यांपूर्वी ‘पीपीपी’ तत्त्वावर मेट्रो प्रकल्प विकसित करण्यास इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवले होते. त्याच पातळीवर या मार्गावर निर्मिती करण्यात येणार्‍या स्टेशनला विविध कंपनींची नावे देऊन निधी उभारण्याचा प्रयत्न ‘पीएमआरडीए’कडून करण्यात येत आहे. त्यानुसार इन्फोसिस चौकातील स्थानक निर्मितीमध्ये सहकार्य करण्याच्या बदल्यात त्या स्थानकाला इन्फोसिस कंपनीचे नाव देण्याच्या प्रस्तावाला इन्फोसिस कंपनीने सहमती दर्शवली आहे.