नियोजित वेळ चुकल्याने अनेकांचा काढता पाय

0

जळगाव । बहूप्रतिक्षेत असलेली जळगावकरांची गेल्या कित्येक वर्षापासूनची विमानसेवेची प्रतिक्षा मुंबई-जळगाव-मुंबई विमानसेवा सुरु होणार असल्याने संपली आहे. याविमानसेवेचा शुभारंभ शनिवारी महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची दुपारी 1.30 वाजेची नियोजित वेळ होती मात्र कार्यक्रमास नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशीर होणार असल्याचे कळल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाल्याने त्यांनी विमानतळावरुन काढता पाय घेतला. नागरिकांसह कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी देखील माघारी परतले. नियोजित वेळेपेक्षा तब्बल अडीच तास विलंबाने दुपारी 4 वाजता विमानाचे लँडींग झाले व 4.50 ला जळगाव येथून विमानाने मुंबईसाठी टेकऑप घेतला.

यांची होती उपस्थिती
यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि.प.अध्यक्षा उज्वलाताई पाटील, महापौर ललीत कोल्हे, खासदार ए. टी.पाटील, आमदार स्मिताताई वाघ, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकरी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, शिक्षणसभापती पोपट भोळे, जैन उद्योग समुहाचे कार्यकारी संचालक अतुल जैन, एअर डेक्कनचे ओनर कॅप्टन जी. आर. गोपीनाथ आदींची उपस्थित होती.

आमदार परतले
जिल्ह्यातील सर्वचे सर्व 13 आमदार, दोन्ही खासदार यांना विमानसेवा शुभारंभाच्या कार्यक्रमास निमंत्रण देण्यात आले होते. त्यापैकी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार उन्मेश पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित राहू शकले नाही. मात्र आमदार हरीभाऊ जावळे, डॉ.सतिष पाटील, संजय सावकारे, सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, शिरीष चौधरी, जि.प.सभापती प्रभाकर सोनवणे आदींनी शुभारंभ कार्यक्रमास विलंब होणार असल्याने केवळ भेट देवून निघून गेले.

जळगावकरांचे स्वप्न साकार
मुंबई-जळगाव-मुंबई विमानसेवेमुळे जळगावचा औद्योगिक विकास झपाट्याने होणार असून मेडिकल हबलाही याचा फायदा होणार असल्याने ही विमानसेवा जळगावच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरणार असल्याचे महसुलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या उडान कार्यक्रमामुळे जळगाव ते मुंबई ही सर्वसामान्य माणसाला परवडणारी व वेळेची बचत होणारी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. या विमानसेवेमुळे जळगावकरांचे गेल्या 43 वर्षांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

जैन समुहाने केेले आरक्षीत
जळगाव येथून मुंबई येथे 19 प्रवाशी प्रवास करणार आहे. त्यापैकी 9 प्रवाशी हे सर्वसाधारण असणार आहे. त्यांना उड्डान योजनेंतर्गत केवळ 1400 रुपये शुल्क भरुन प्रवास करता येणार आहे. उर्वरीत 2600 रुपये शासन भरणार आहे. पुढील तीन महिन्यासाठी जैन उद्योग समुहाने दररोज तीन सिट आरक्षीत केले असून एका महिन्याचे देयक शुभारंभ प्रसंगी धनादेशाद्वारे अदा केले आहे. एक रुपयांत विमान प्रवासाचे बुकींग करणार्‍या प्रवाशांपैकी लकी ड्रा काढण्यात येणार असून आठवडयातून एकदा त्यातील तीन लकी प्रवाशांना एक रुपयात विमानप्रवास करता येणार असल्याचेही कॅप्टन गोपीनाथ यांनी सांगितले.

कलेक्टर कन्याही उपस्थित
विमानसेवेच्या उद्घाटनाला शहरासह परिसरातील नागरिक विमानतळावर आले होते. अनेकांनी आपल्या परिवाराला देखील याठिकाणी आणले होते. शाळकरी लहान मुलंदेखील आनंद घेण्यासाठी विमानतळावर आले होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची कन्या देखील आल्या होत्या.

जळगावचा जीडीपी वाढेल
विमानसेवा सुरु झाल्याने पर्यटनासहीत व्यापारात वृध्दी होणार आहे. जळगावचा जीडीपी यामुळे वाढण्यास मदत मिळेल. व्यापारी, पर्यटक यांना जळगाव येथे येण्यासाठी औरंगाबादहून यावे लागत होते. जळगाव येथे विमानसेवा प्रारंभ झाल्याने हा वेळ वाचणार आहे. विमानसेवेशी जोडले जाणार असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापार वृध्दींगत होण्यास मदत मिळेल.
-अतुल जैन (कार्यकारी संचालक जैन उद्योग समुह)

नाईट लॅडींग व्हावे
विमानसेवा सुरु झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विमानसेवा सुरु व्हावे यासाठी मागील पंचवार्षीक पासून प्रयत्न करीत आहे, मात्र यश येत नव्हते. अखेर पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून विमानसेवा सुरु झाली आहे. व्यापार, पर्यटनास चालना मिळणार आहे. विमानाचे नाईट लँडींगही व्हावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
-खासदार ए.टी.पाटील

सुवर्णनगरीत भरभराट
विमानसेवा सुरु झाली ही जळगावकरांसह जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठी बाब आहे. जळगाव नगरी सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाते. विमानसेवेमुळे सोन्याचा व्यापार वाढणार आहे. त्यामुळे सुवर्णनगरीत अधिक भरभराट येणार आहे. कमी वेळेत अधिक काम होईल. यामुळे संपूर्ण देशात जळगावचे नाव होईल.
-ललित कोल्हे, महापौर

अतिप्रसंगाच्या वेळी मुंबईला जाण्यासाठी ही सेवा उपयोगात येणार आहे. संपूर्ण राज्यात ही सेवा सुरु व्हावी. नियोजित वेळेत सेवा मिळाल्यास त्याचा उपयोग होईल. तसेच यामुळे जळगावच्या नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळेल.
-सागर परदेशी (उपस्थित नागरीक)

अनेक दिवसापासून विमानसेवा रखडली होती. अखेर नवीन जिल्हाधिकारी आल्यानंतर त्यांनी काम मार्गी लावले. त्यामुळे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाली आले. जळगाव शहरातील वाढते उद्योगासाठी विमानसेवा सुरु होणे काळाची गरज आहे.
-सुरेश ठाकरे (उपस्थित नागरीक)

गाजावाजा करणारे सरकार
या सरकारने निव्वळ जाहिरातबाजी व गाजावाजा करण्यावर भर दिला आहे. प्रत्यक्ष वेळेवर कोणतेही काम सरकार करत नसल्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आजच्या विमानसेवा शुभारंभास होणारा विलंब आहे. विमानसेवेच्या शुभारंभासाठी प्रशासनाने नियाजनासाठी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. विमानसेवा सुरु झाल्याने व्यापार, पर्यटन क्षेत्रात वृध्दी होणार आहे मात्र नियमीत सेवेत खंड पडलायला नको अशी अपेक्षा आहे.
– आमदार डॉ.सतिष पाटील

शहरातील कंपन्यांसाठी ही विमानसेवा फायदेशीर आहे. यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्या वेळेत बचत होणार आहे. तातडीच्या वेळी विमानसेवा सोईस्कर ठरणार आहे.
-प्रल्हाद वाणी(उपस्थित नागरीक)