निरंकारी सामूहिक विवाह सोहळ्यात 90 जोडपी विवाहबद्ध

0
आध्यात्मिक प्रमुख सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांनी केले मार्गदर्शन
चिंचवड : संत निरंकारी मिशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका आकर्षक सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली 90 जोडपी विवाहबद्ध झाली. महाराष्ट्राच्या 52व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची मुंबईमध्ये विधिवत सांगता झाली. या सांगतेनिमित्त त्याच ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साध्या पण प्रभावशाली पद्धतीने आयोजित केलेल्या या विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी मिशनच्या पारंपारिक ‘जयमाला’ आणि प्रत्येक जोडप्याच्या गळ्यात ‘सामायिक हार’ घालून करण्यात आला. त्यानंतर सुमधूर संगीताच्या चालीवर पवित्र मंत्रांच्या रुपात असलेल्या 4 ‘निरंकारी लांवां’चे (मंगलाष्टका) गायन करण्यात आले.
अक्षता म्हणून फुलांचा वापर 
विषेश म्हणजे अक्षता म्हणून फुलांचा वापर करण्यात आला. सद्गुरू माता सुदीक्षाजी यांनी नवविवाहित दांपत्यांना आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना म्हटले की, त्यांनी आपापल्या कौटुंबीक जबाबदार्‍या यथायोग्य पार पाडाव्यात. अधिकारांपेक्षा कर्तव्यपालनावर त्यांनी भर द्यावा. समंजसपणाने अभिमानरहित होऊन एकमेकांचे स्वभाव समजून घ्यावेत व मना-मनाचे नाते जोडावे. भौतिक जीवन जगत असताना आपली आध्यात्मिक ओळख विसरु नये. सत्संग, सेवा आणि नामस्मरण करत भक्तिमय जीवन जगावे. निरंकार प्रभुने सर्वांना सुखशांतीमय जीवन प्रदान करावे, अशी शुभकामना सद्गुरू माताजींनी व्यक्त केली.
साध्या विवाहाला पसंती
आजच्या या विवाह सोहळ्यामध्ये वधू-वरांच्या जोड्या आंतरराज्यीय स्वरुपाच्या होत्या. पुणे, मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागातून तसेच गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदिगड, ओडिशा, कर्नाटक, गोवा आणि आसामचा समावेश होता. मजेशीर बाब म्हणजे 17 वधू आणि 12 वर संत निरंकारी मिशनच्या बाहेरील होते. याचाच अर्थ मिशन बाहेरील 29 कुटुंबांनी या साध्या विवाह पद्धतीला पसंती दिली. निरंकारी सामूहिक विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी विवाह-संबंध जुळविण्यासाठी जात किंवा धर्म विचारात घेतला जात नाही.