राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची माहिती
मुंबई : निरंजन डावखरे यांना आमदारकीच नाही तर त्यांच्यावर विश्वास टाकून विदयार्थी व युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देवून राज्याचे नेतृत्व करण्याची संधी पक्षाने दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यासाठी आजपर्यंत अनेक उपलब्ध जागा आणि संधी देवूनही त्यांनी केवळ संधीसाधूपणामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच त्यांची ६ वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.
निरंजन डावखरे यांचा संधीसाधूपणाचा इतिहास बघता ते जिथे कुठे जाणार असतील त्या पक्षाला त्यांच्या या संधीसाधूपणाचा फटका केव्हातरी बसेल असा इशाराही शिवाजीराव गर्जे यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निरंजन डावखरे यांची पहिल्या वेळेस वय भरत नसल्याने उमेदवारी होवू शकली नाही मात्र नंतर वय भरल्यानंतर विधानपरिषदेची आमदारकी दिली. एकाच वेळी मुलगा आणि वडील विधानपरिषदेचे आमदार बनवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले आहे. कै. वसंतराव डावखरे यांना पक्ष स्थापनेपासून आणि संकटात असताना पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला. वसंतराव डावखरे यांना प्रदिर्घ काळ विधानपरिषदेचे उपसभापतीपद आणि उपाध्यक्षपद पक्षाने दिले होते असे असतानाही पक्षाने अन्याय केला म्हणणे योग्य नसल्याचेही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे.