निरपराधांवरील गुन्हा वगळण्यात यावा

0

धुळे । शहरात 21 डिसेंबरच्या रात्री गजानन कॉलनी परिसरात झालेल्या घटनेची दंगल म्हणून नोंद करीत पोलिसांनी निरपराधांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केवळ दगडफेकीची असून या संदर्भात लावलेले 307 कलम अन्यायकारक असल्याने ते वगळण्यात यावे अशा मागणीचे निवेदन निवेदन धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. 21 तारखेच्या रात्री धुळे महानगरातील गजानन कॉलनी येथे दोन गटात दगडफेकीचा प्रकार घडला परंतु वेळेत पोलीस प्रशासनाने हालचाली करुन नाकाबंदी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

307 कलम लावण्यात आले
या घटनेनंतर या दोन्ही बाजुचे आरोपी करण्यात आलेले आहेत. परंतु या घटनेत कोणालाही इजा झालेली नसतांना, कुणीही जखमी होवून दवाखान्यात उपचारार्थ दाखल नसतांना या घटनेतील आरोपींवर कलम 307 लावण्यात आले आहे. दंगलीच्या ठिकाणी काही वाद मिटवण्याची भुमिका घेत असलेल्या लोकांवर तसेच प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी हजर नसलेल्या लोकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर लोकांची नावे या गुन्ह्यातुन वगळण्यात यावी व त्यांना योग्य तो न्याय द्यावा असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देतांना पालकमंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख सतिष महाले, संघटक महेश मिस्तरी, अतुल सोनवणे, अतुल श्रीवर्धनकर, सुनिल बैसाणे, अ‍ॅड.पंकज गोरे, ललित माळी, किरण जोंधळे, मयुर कंड्रे, माजी नगरसेवक भगवान गवळी, देवीदास लोणारी इत्यादी उपस्थित होते.