23 लाभार्थ्यांना मिळणार लाभ
चिंचवड : गुढी पाडव्याच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक, विधवा, अंध, अपंग, घटस्फोटित महिला अशा विविध 323 नागरिकांना संजय गांधी निराधार योजना समितीच्यावतीने भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष गोपाळ माळेकर यांच्या हस्ते रविवारी पेन्शनपत्रांचे वाटप करण्यात आले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील या नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. रहाटणीतील बळीराज कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सविता खुळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव, गणेश नखाते, बाबा त्रिभुवन, चंद्रकांत तापकीर, नरेश खुळे, समितीचे सदस्य दिलीप गडदे, बिभीषण चौधरी, नरेंद्र माने, अश्विनी तापकीर, अदिती निकम, चैत्राली शिंदे आदी उपस्थित होते.
शिबिरास उत्तम प्रतिसाद
संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष गोपाळ माळेकर म्हणाले की, समितीच्यावतीने जानेवारी महिन्यामध्ये बळीराज मंगल कार्यालयात दोन दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. अनेक गरजूंनी संपर्क साधला होता. त्यामध्ये 1100 लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा केली होती. त्यातील 323 प्रकरणे मंजूर करण्यात आले. उर्वरित सर्व लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून टप्याटप्याने ते मंजूर करण्यात येणार आहे.
लवकरच कार्यालय आकुर्डीत होणार
प्रकरण मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पेन्शनपत्रांचे वाटप झाले. यावेळी आमदार जगताप यांनी मार्गदर्शन केले. संजय गांधी निराधार योजना समितीचे कार्यालय पुण्यात आहे. तेथे जाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होते. समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या समितीचे कार्यालय आकुर्डीत सुरू होणार असून, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले.