भुसावळ । जागतिक योग दिनानिमित्त शहरासह परिसरातील शाळा – महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयांतर्फे सकाळी सुर्योदयासोबत योगसाधना व प्राणायाम करण्यात येऊन निरामय आयुष्य जगण्याचा संकल्प करण्यात आला.
पोलीसाणीही केली योगासने
पोलीस प्रशासनातर्फे पोलीस ऑफीसर विश्रामगृहातील मैदानावर सकाळी योगासने करण्यात आली. आर्ट ऑफ लिव्हींगचे देवेंद्र पाटील व अमित असोदेकर यांनी मार्गदर्शन केले. यात सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस निरीक्षक वसंत मोरे, चंद्रकांत सरोदे व पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच रेल्वे विभागातर्फे रेल्वे क्रीडांगणावर योगासने करण्यात आली. डिआरएम यादव यांसह एडीआरएम अरुण धार्मिक व विभागीय अधिकारी सहभागी झाले होते. तसेच
पंचायत समिती, भुसावळ
पंचायत समिती कार्यालयात देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हींगच्या स्वयंसेवकांनी कर्मचार्यांना योगासनाचे धडे दिले. तसेच प्राणायामाचे तंत्र शिकवले.
ताप्ती स्कुलमध्ये चिमुकल्यांच्या कसरती
ताप्ती पब्लिक स्कुलमध्ये मुख्याध्यापिका निना कटलर, योग शिक्षीका अनुराधा देसाई, वृषाली गाडगीळ यांनी मुलांना विविध योगासने शिकविली. यात त्यांना धनुरासन, अर्धचक्रासन, पद्मासन, शिर्षासन आदी आसने शिकवली. योग सुदृढ शरीरासाठी किती उपयुक्त आहे. याबाबतीत मुलांना माहिती दिली. कार्यक्रमाप्रसंगी पर्यवेक्षीका पल्लवी बत्रा, तानिया गॉटींग उपस्थित होत्या.
भाजपाला पडला विसर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून जगभरात 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. मात्र असे असताना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योगदिनाचा विसर पडला असल्याचे दिसून आले. याबाबत शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे यांना विचारणा केली असता रुग्णालयाच्या कामानिमित्त बाहेरगावी असल्याचे सांगितले. तसेच इतर पदाधिकार्यांनी देखील आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहर भाजपेयींना याचे महत्व दिसत नसल्याचे समजते.