निरामय व सुदृढ आरोग्यासाठी धावले भुसावळकर

0

‘रन फॉर भुसावळ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद ; दिड हजार स्पर्धक धावपटूंसह महिला, तरुण व आबालवृद्धांनी धावत वाढवला स्पर्धकांचा उत्साह

भुसावळ- निरामय व सृदृढ आरोग्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेला रविवारी भुसावळकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटेच्या गुलाबी थंडीत तीन गटात सहभागी असलेल्या एक हजार 600 स्पर्धक धावपटूंसह महिला, तरुण-तरुणी व आबालवृद्धांनीही स्पर्धेत सहभागी होवून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. पहाटेच्या आल्हाददायी वातावरणात पार पडलेल्या व अत्यंत काटेकोर नियोजन असलेल्या स्पर्धेने भुसावळकर सुखावले. शहरात सलग दुसर्‍या वर्षी झालेल्या स्पर्धेर्चे शहरवासीयांनी स्वागत करीत पोलिस प्रशासनाला धन्यवादही दिले. तीन, पाच व दहा किलोमीटर अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. 12 वयोगटाच्या स्पर्धकापासून वयाच्या पंच्याहत्तरी गाठलेल्या चिरतरुण स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत सर्वांचाच उत्साह वाढवला. पोलिस प्रशासनाने स्पर्धेदरम्यान अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने धावपटूंची कुठलीही गैरसोय झाली नाही तर स्पर्धेच्या आयोजकांसह नियोजन समितीच्या कार्यकर्त्यांना स्पर्धकांना मार्ग कळवण्यासाठी स्वयंसेवकही नेमले होते. स्पर्धेच्या मार्गावर धावपटूंसाठी लिंबू सरबतासह पाण्याची व्यवस्था करण्यात आली तर रस्त्यांवरील चौका-चौकात नागरीकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्पर्धकांचा उत्साह वाढवत त्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी आमदार संजय सावकारे यांच्यासह सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक कुंदन ढाके व बियाणी ग्रुपचे मनोज बियाणी, गोदावरी फाऊंडेशनचे डॉ.उल्हास पाटील प्रमुख प्रायोजकांसह व अन्य दात्यांचे सहकार्य लाभले. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी यांची होती उपस्थिती
स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानीE भुसावळचे डीआरएम आर.के.यादव, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन कुंदन ढाके, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, डीवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, नगरसेवक प्रमोद बर्‍हाटे, नगरसेवक पिंटू कोठारीE उद्योजक मनोज बियाणी, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, संदीप देशमुख यांच्यासह महिलांमधून आमदारांच्या पत्नी रजनी सावकारे, संगीता बियाणी आदींची उपस्थिती होती.