‘रन फॉर भुसावळ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद ; अडीच हजार स्पर्धक धावपटूंसह महिला, तरुण व अबालवृद्धांनी धावत वाढवला स्पर्धकांचा उत्साह
भुसावळ : निरामय व सृदृढ आरोग्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेला रविवारी भुसावळकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटेच्या गुलाबी थंडीत तीन गटात सहभागी असलेल्या सुमारे अडीच हजार स्पर्धक धावपटूंसह शहरातील महिला, तरुण-तरुणी व आबालवृद्धांनीही स्पर्धेत सहभागी होवून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. पहाटेच्या आल्हाददायी वातावरणात पार पडलेल्या व अत्यंत काटेकोर नियोजन असलेल्या स्पर्धेने भुसावळकर सुखावले. शहरात सलग तिसर्या वर्षी झालेल्या स्पर्धेचे शहरवासीयांनी स्वागत करीत पोलिस प्रशासनाला धन्यवादही दिले. तीन, पाच व दहा किलोमीटर अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आलेल्या स्पर्धेत पारदर्शी निकालासाठी आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पाच वर्ष वयोगटाच्या स्पर्धकापासून वयाच्या पंच्याहत्तरी गाठलेल्या चिरतरुण स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत भुसावळकरांचा उत्साह वाढवला. दरम्यान, स्पर्धेसाठी आमदार संजय सावकारे, सिद्धीविनायक ग्रुप, बियाणी एज्युकेशन व गोदावरी फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.
या मान्यवरांची स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती
स्पर्धेसाठी आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, ऑर्डनन्स फॅक्टरीचे जनरल मॅनेजर राजीव पुरी, वरणगाव ऑर्डनन्सचे जनरल मॅनेजर चॅटर्जी, एजीएम सुधीर मलिक, मिलिटरी स्टेशनचे कमांडर करण ओहरी, नगराध्यक्ष रमण भोळे, सिद्धीविनायक ग्रुपच्या संचालिका प्रज्ञा यतीन ढाके, उद्योगपती मनोज बियाणी, तहसीलदार दीपक धीवरे, पालिका मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्यासह अन्य मान्यवरांची स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती होती तर या मान्यवरांच्या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून सुरूवात करण्यात आली.