निरोगी व्यक्ती ताकदीसोबतच आर्थिकदृष्ट्याही सामर्थ्यवान बनतो – आमदार लक्ष्मण जगताप

0
पिंपरी : माणसाने सामर्थ्यवान होण्यासाठी आधी निरोगी असणे गरजेचे आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी जे काही करता येईल, ते केले पाहिजे. निरोगी व्यक्ती केवळ ताकदीनेच नव्हे; तर आर्थिकदृष्ट्याही सामर्थ्यवान बनतो, असे मत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 11 व 13 जानेवारी दरम्यान सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर गरजू व गोरगरीब रुग्णांसाठी आयोजित मोफत अटल महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सचिव ओमप्रकाश शेटे, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्‍विनी जगताप, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, उपमहापौर सचिन चिंचवड, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका उषा मुंढे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, हर्षल ढोरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, डॉ. जयश्री तोडकर, डॉ. ओमप्रकाश शेटे, डॉ. अशोक नंदापूरकर, डॉ. संजय देशमुख, माजी नगरसेवक शंकर जगताप आदी उपस्थित होते.
लक्ष्मण जगताप म्हणाले, प्रत्येकाचे आरोग्य निरोगी असले पाहिजे. त्यामुळे सक्षम होता येते. एखाद्या गरीबाला आजार जडला, तर त्या कुटुंबाच्या आयुष्याची संपूर्ण कमाई पणाला लावाली लागते. संबंधित कुटंब कोळमडून पडते आणि देशोधडीला लागते. तसे होऊ नये. एकही कुटुंब आजारपणामुळे देशोधडीला लागू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. विविध आरोग्य योजनांमार्फत गोरगरीब रुग्णांना मोठ्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. महाराष्ट्रात गेल्या 15 ते 20 वर्षात आरोग्य विभागामार्फत रुग्णांना जेवढी मदत मिळाली नाही त्यापेक्षा किती तरी अधिक पट आताच्या सरकारने अवघ्या चार वर्षांत मदत केली आहे. गेल्या चार वर्षांत विविध आजार झालेल्या रुग्णांना 1400 कोटींची मदत झाली आहे. मी स्वतः दरवर्षी शासनाची 2 कोटींची मदत रुग्णांसाठी घेऊन येत आहे. ही मदत गरजू रुग्णांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनीही पुढे यावे. कोणीही उपचारापासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. जयश्री तोडकर म्हणाल्या, जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांच्या लठ्ठपणात भारत जगात दुसर्‍या क्रमांकाचा देश असल्याचे म्हटले आहे. ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. जीवनशैली बदललेली असली, तरी जेवण शैली आहे तशीच आहे. ताव मारा अशीच बनली आहे. जीवनशैली म्हणजे जास्तीत जास्त बैठे काम आणि आरामदायी बनले आहे. त्यामुळे खाल्लेले अन्न साचून विष बनून भिनते आहे. 30 वर्षाखाली ह्दयाचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. या आरोग्य शिबीराच्या निमित्ताने सर्वांनी मी जंकफूट खाणार नाही, हे ठरविले पाहिजे. दिवसांतून एक दिवस मैदानावर घालवणार, असा निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा आपली पुढची पिढी आपल्या आधी संपल्याचे बघायला लागू शकते, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे आणि अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात स्वच्छतेचा संदेश देत पिंपळेगुरव ते कन्याकुमारीपर्यंत सायकलने प्रवास करणारे माऊली जगताप, विशाल कदम, राहुल कुडाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला