निर्गुणत्वाशी संबंध व कृष्णकार्याचा संचय म्हणजे गोपाळकाला

0

मुक्ताईनगर। गोपाळकाला म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला संचय होय. गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधीत्व करतो. पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक असल्याचे हभप शारंगधर महाराज यांनी काल्याच्या कीर्तनात सांगितले.

एकनाथ महाराजांनी केले पारायण
मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहूण आयोजित मुक्ताई गुप्तदिन सोहळ्याच्या समारोपाप्रसंगीच्या काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. संत मुक्ताई गुप्तदिन सोहळा गुरूवार 11 ते 23 दरम्यान पार पडला. सोहळ्यात एकनाथ महाराज कुर्‍हा काकोडा हे ज्ञानेश्‍वरी पारायण प्रवक्ते होते.

सोहळ्यात यांची झालीत कीर्तने
यावेळी ज्ञानदेव महाराज, ज्ञानेश्‍वर महाराज, महादेव महाराज, गोपाळ महाराज, नारायण महाराज, ज्ञानेश्‍वर महाराज, गिरिश महाराज, सुरेश महाराज, कौतिक महाराज, निवास महाराज, दामोदर महाराज, तुकाराम महाराज यांची किर्तने झाली. विशेष कार्यक्रमात 21 रोजी सकाळी 10 वाजता संत मुक्ताई गुप्त दिनी सुधाकर महाराज यांचे कीर्तन झाले. कीर्तनाला हजारो भाविकांचा जनसमुदाय होता. त्यानंतर संभाजी मोतीराम पाटील व पांडुरंग शामू महाजन यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.

26 ला दिंडी प्रस्थान
तळवेल ग्रामस्थांनी शुद्ध पिण्याच्या थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. सायंकाळी दिंडी, प्रदक्षिणा व रात्री कीर्तन झाले. 22 रोजी सकाळी 11 वाजता मासिक वारी हरिकिर्तन किशोर महाराज यांचे झाले. 23 रोजी सकाळी 9 वाजता शारंगधर महाराज यांनी संत तुकाराम यांचे बंधू कान्होबाराय यांचा अभंगावर काल्याच्या कीर्तनाचे चिंतन केले. शुक्रवार 26 रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मेहूणहून पायी दिंडी पालखी प्रस्थान होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत मुक्ताई देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.