निर्घण खुनाने आकुर्डी हादरले!

0

पिंपरी-चिंचवड : आकुर्डी परिसरात दहशत पसरवणार्‍या रावण सेना टोळीचा म्होरक्या अनिकेत राजू जाधव (वय 22, रा. जाधव वस्ती, रावेत) याचा पूर्ववैमनस्यातून सहा जणांच्या टोळक्याने निर्घृन खून केला. त्याच्यावर कोयता, तलवारीने सपासप वार करत डोक्यात दगड घातला आहे. ही घटना सोमवारी (दि.20) रात्री पावणेबाराच्या सुमारास आकुर्डी गावठाणातील पंचतारानगर येथे घडली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी हनुमंत शिंदे (रा. देहूरोड) याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. तर, सोन्या काळभोर, अक्षय काळभोर (दोघे रा. पंचतारानगर, आकुर्डी), दत्ता काळभोर (रा. समर्थनगरी, निगडी), जीवन सातपुते, बाबा ऊर्फ अमित फ्रान्सिस (दोघे रा. भोसरी) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे फरार आहेत. याबाबत सूरज संतोष दास (वय 18, रा. महादू वाल्हेकर चाळ, वाल्हेकरवाडी) याने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पूर्ववैमनस्यातून खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत जाधव व आरोपी यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य आहे. जाधव व फिर्यादी दास दोघे सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दुचाकीवरून आकुर्डी गावठाणातून जात होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या सोन्या काळभोर याने जाधव याच्यावर लोखंडी कोयत्याने तर हनुमंत शिंदे, अक्षय काळभोर याने तलवारीने वार केले. इतर आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण करत दगड डोक्यात घातले. जबर मार लागल्याने अनिकेत जाधव याचा जागीच मृत्यू झाला.

जाधव याच्यावर खुनासह सहा गंभीर गुन्हे
दरम्यान, आकुर्डी परिसरात मागील काही दिवसांपासून रावण सेना दहशत पसरवत आहे. अनिकेत हा त्या टोळीचा म्होरक्या होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. जाधव हा काही दिवसापूर्वी महाकाली टोळीचा म्होरक्या हनम्या ऊर्फ हनुमंत शिंदे याच्यावर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील दाखल गुन्ह्यात फरार आरोपी होता. निगडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे अधिक तपास करत आहेत.