निर्जीव बाहुल्या करतात सजिवांचे रंजन…

0

आपल्या लहानपणी बाहुला-बाहुलीचा खेळ प्रत्येकाने खेळला असेल. मोहंजोदडोच्या उत्खननात हात, पाय हलणारी बाहुली आढळली मंडळी. भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून बाहुली-बाहुला खेळला जातोय. त्याचे दाखले आपल्या पाणिनी, ज्ञानेश्‍वरी आणि दासबोधात वाचायला मिळतात. ही निर्जीव कळसूत्री बाहुली आपल्या सजिवांचे मनोरंजन करत आली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत बाहुला अनन्य साधारण महत्त्व आहे. या बाहुल्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज 21 मार्चला जागतिक कठपुतळी दिवस साजरा होत आहे.

महाराष्ट्रात ज्यांनी सीता स्वयंवर हे नाटक रंगमंचावर आणले ते विष्णुदास भावे या नाटकांचा प्रयोग हा कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून करत असत. 1843मध्ये त्यांचा सांगलीला पहिला नाट्यप्रयोग झाला. म्हणजे 64 कलांमध्ये कळसूत्री बाहुली नाट्यप्रयोगाला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. भारतभरातील अनेक राज्यांमध्ये कळसूत्री बाहुल्यांवर काम होत आहे, नवनवीन प्रयोग होत आहेत. मनोरंजन प्रधान साधनं उम्रटाच्या आत आले, इतकेच नव्हे तर मोबाइलच्या रूपात हे साधन आपल्या हातात आले. वेळ मिळेल तेव्हा मोबाइलवर रंजन करून घेतो आपण. या आधुनिक युगातदेखील कळसूत्री बाहुल्या किंवा पपेट शो जिथे कुठे असेल तर त्याला आजही उत्तम प्रतिसाद मिळतो. इतकंच काय हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा कळसूत्री बाहुल्या दिसतात, दाखले दिले जातात. आनंद हा राजेश खन्ना आणि अमिताभचा सुप्रसिद्ध चित्रपट. ज्यावेळी आनंद कर्करोगानं अत्यवस्थ असतो, शेवटची घटका मोजत असतो. सगळे डॉक्टरी इलाज संपलेले असतात. दोन डॉक्टर हतबल होऊन फक्त बघत असतात. काही करू शकत नाहीत. क्लायमेक्स बघा… आनंदनं पूर्वी ग्रामोफोनवर रेकॉर्ड केलेला संवाद, तो खूप काही तत्त्वज्ञान शिकवून जातो. तो संवाद असा, ‘बाबू मोशाय, हम तो रंगमंच की कठपुतली है, जिसकी डोर उस उपरवाले के हाथों में है। कौन, कब, कहाँ उठेगा ये कोई नहीं बता सकेगा…’ आपण या दुनियेत कळसूत्री बाहुल्याच तर आहोत ना.

बाहुल्या आणि शब्दभ्रम बोलक्या बाहुल्यांचा अफलातून प्रयोग जगभर होतोय. आपल्या देशातही ’शब्दभ्रम’ कलेला प्रतिष्ठा मिळाली आहे. ’बोलक्या बाहुल्या’ म्हटले की मराठी माणसाला पहिलं नाव आठवते ते रामदास पाध्ये म्हणजे पाध्ये परिवाराचे. आपले जीवन त्यांनी या बोलक्या बाहुल्यांसाठी समर्पित केले आहे. वडील यशवंत पाध्ये, स्वतः रामदास आणि त्यांची पत्नी अपर्ण, दोन्ही मुले परिक्षित आणि सत्यजीत अशा तीन पिढ्यांनी विविध प्रयोग केले आहेत. आता तर सत्यजीतची पत्नी ऋतुजा हीदेखील मदतीला आलीय. आपली पपेट संस्कृती सातासमुद्रापार पाध्ये परिवाराने नेली आहे. असेच काम खान्देशातील जळगाव जिल्ह्यातले चोपडा येथील कलाशिक्षक दिनेश साळुंखे यांनीदेखील केले आहे. आजच्या डिजिटल युगात पारंपरिक कठपुतळी कलेला जोपासण्याचे कार्य साळुंखे यांनी केले आहे. त्यांनी 300 हून अधिक कार्यक्रम केले आहेत. 2014 मध्ये त्यांना आपल्या पपेट शोसंदर्भात सोनी दूरचित्रवाणी वाहिनीवर कला सादर करण्याची संधी मिळाली. एन्टरटेन्मेंट के लिये कुछ भी करेगा या कार्यक्रमात तर त्यांना रोख पारितोषिक मिळाले आहे. दिनेश साळुंखे यांनी 2016ला भारतीय संस्कृती आणि पपेट शो घेऊन पोलंड येथे जाऊन आले. मनोरंजनाच्या विश्‍वात तर पपेटचे महत्त्व जाणून हा आंतरराष्ट्रीय दिवस 2003 पासून साजरा करण्याची प्रथा सुरू झालेली आहे. बाहुल्यांच्या विश्‍वात काम करणार्‍या सगळ्यांना या जागतिक कठपुतळी दिवसाच्या औचित्यानं मनःपूर्वक शुभकामना!र

– किशोर कुळकर्णी
जळगाव.