निर्णय होईस्तोवर परिचारिकांना प्रवेश नाही

0

परिचारकांना बडतर्फ करण्यावरून शिवसेना आक्रमक
सेना आमदारांनी केला सभात्याग;

मुंबई :- सैनिक पत्नींचा अपमान करणार्‍या प्रशांत परिचारक यांचे बडतर्फ करून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत मंगळवारीही दोन्ही सभागृहात शिवसेना आमदार आक्रमक झाल्यांनतर या प्रकरणी अंतिम निर्णय येईस्तोवर प्रशांत परिचारक यांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. विधानपरिषदेत परिचारकांचे निलंबन रद्द केल्याच्या विरोधात निलंबन कायम राहावे यासंबंधी गटनेते अनिल परब यांनी प्रस्ताव ठेवला. यावर चर्चा झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या प्रकरणी अंतिम निर्णय येईपर्यंत परिचारक यांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचे निवेदन विधानपरिषदेत केले.

विधानसभेत सेना उतरली वेलमध्ये
सरकारने परिचारकांवर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करीत शिवसेना सदस्यांनी वेलमध्ये उतरून ‘देशद्रोही परिचारक’ अशा आशयाचे बॅनर झळकावले. शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर सभागृह सुरू झाल्यानंतरही सरकारकडून योग्य उत्तर न आल्याने शिवसेना आमदारांनी परिचारक यांचा निषेध करीत सभात्याग केला.सभागृहाचे काम सकाळी सुरू होताच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत परिचारक यांच्याविषयी सरकारने काय निर्णय घेतला असा सवाल करीत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. याचवेळी शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा देत पृथ्वीराज चव्हाण यांनी जनता प्रक्षुब्ध आहे. सरकार परिचारकांना पाठीशी घालत आहे काय असा सवाल करीत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. जयंत पाटील यांनीही सुनील प्रभू यांनी मांडलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा असून परिचारक यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली.

परिचारक यांना सदस्य राहण्याचा अधिकार नाही
परिचारक यांचे वक्तव्य सैनिकांचे मनोधेर्य खच्ची करणारे आहे. सभागृहाच्या भावना तीव्र असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांना या सभागृहाचे सदस्य राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. यावेळी सरकारने भूमिका मांडण्याचे निर्देश अध्यक्ष हिरभाऊ बागडे यांनी दिले असता गिरीश बापट यांनी सरकार आजच्या दिवसाचे कामकाज संपेपर्यंत भूमिका स्पष्ट करेल असे सांगितले. यावर शिवसेना तसेच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत परिचारक हाय हाय अशा जोरदार घोषणा दिल्याने सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. यानंतर सभागृह सुरू झाल्यनंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार योग्य भूमिका स्पष्ट करेल असे उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने शिवसेना आमदारांनी सभात्याग केला.

सभागृहाच्या तीव्र भावना
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिचारक यांच्याबाबत सभागृहाच्या भावना तीव्र असून याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत याप्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकाच विचाराचे असल्याची भूमिका मांडली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभेप्रमाणे विधान परिषदेचे सभागृह स्वायत्त आहे. तेथे या विषयावर चर्चा करण्यात येत असून याबाबत निर्णय होईल. त्यामुळे आपल्याला त्यांच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण करता येणार नसल्याचे सांगत प्रशांत परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य असल्याची बाब नजरेसमोर आणून दिली. मुख्यमंत्र्यांचे उत्तर संपताच सुनील प्रभू यांनी परिचारक यांच्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचा आरोप करत सर्व शिवसेना सदस्य सभात्याग करत असल्याचे जाहीर करत सभागृहातून बाहेर पडले

परिषदेच्या निर्णयानंतर भूमिका मांडणार – मुख्यमंत्री
परिचारक यांच्या वक्तव्याचे समर्थन होऊ शकत नाही. त्यांचे वक्तव्य निषेधार्हच असून कारवाई झालीच पाहिजे. त्यानुसार विधान परिषदेत एकमताने निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. परिचारक यांच्या संदर्भातील निर्णय वरच्या सभागृहाच्या अखत्यारित येत असल्याने तिथे जो निर्णय होईल. त्यानंतर सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.