निर्णायक लढतीत पाकिस्तानला दिली मात

0

शारजाह । अंधाच्या विश्‍वचषक स्पर्धेतील निर्णायक लढतीत सलग दुसर्‍यांदा पाकिस्तानला 2 विकेट्सनी मात देत विश्‍वचषकावर नाव कोरले. शारजाह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांवर दोन विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 40 षटकांमध्ये भारताला विजयासाठी 308 धावांचे आव्हान दिले. भारताने हे आव्हान 39 षटकात 8 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारतासाठी सुनील रमेशने 93 आणि अजय रेड्डीने 62 धावांची खेळी केली. अंधाच्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारताचे हे दुसरे विजेतेपद आहे. याआधी भारताने 7 डिसेंबर 2014 रोजी द.आफ्रिकेतील केपटाऊन शहरात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात झालेल्या पाकिस्तानला हरवून पहिल्यांदा विश्‍वचषक स्पर्धा जिंकली होती. आतापर्यंत एकूण पाच वेळा अंधाच्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी दोन वेळा विश्‍वचषक जिंकला, तर एक वेळ द.आफ्रिका विजयी ठरली होती. याशिवाय भारताने दोन वेळा अंधाची टी 20 क्रिकेट विश्‍वचषक जिंकला आहे. भारताने उपांत्य फेरीत बांगलादेशला सात विकेट्सनी हरवले होते, तर पाकिस्ताने श्रीलंकेवर 156 धावांनी विजय मिळवला होता. स्पर्धेत भारताने अपराजीत वाटचाल केली. यादरम्यान साखळी लढतीतील सामन्यातही भारताने पाकिस्तानला सात विकेट्सनी हरवले होते.

पाकिस्तानविरुद्धच्या या लढतीत नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर भारतीय संघाचा कर्णधार अजयकुमार रेड्डीने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांनी चांगला खेळ केल्यामुळे पाकिस्तानने 40 षटकांमध्ये 3 बाद 308 धावा केल्या. बदर मुनीरने (57), रियासत खान (48) आणि कर्णधार निसार अलीने 47 धावा करत संघाला त्रिशतकी धावसंख्या रचून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

भारताची आक्रमक सुरुवात
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना व्यंकटेश (35) आणि प्रकाश जयरमैय्याने(44) संघाला वेगवान सुरुवात करुन दिली. त्यामुळे अवघ्या सहा षटकांमध्ये अर्धशतकी धावा केल्या होत्या. सलामीची जोडी बाद झाल्यावर सुनील रमेश आणि अजयकुमार रेड्डीने भारताचा डाव सावरला. 34 व्या षटकात भारताच्या 3 बाद 264 धावा झाल्या होत्या. 35 व्या षटकात सुनीलही बाद झाला. सुनीलला अवघ्या सात धावांनी हुलकावणी दिली. त्यानंतर अजय 62 धावांवर बाद झाला.