मुंबई/पुणे : पिंपरी-चिंचवड, पुणेसह राज्यातील दहा महानगरपालिका आणि दुसर्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणार्या 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी (दि. 21) मतदान होत असून, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 3 हजार 210 जागांसाठी 17 हजार 331 उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यासाठी 3 कोटी 77 लाख 60 हजार 812 मतदारांकरिता 43 हजार 160 मतदान केंद्रांची; तसेच 68 हजार 943 कंट्रोल युनिट व 1 लाख 22 हजार 431 बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर 2 लाख 73 हजार 859 कर्मचार्यांसह आवश्यक तेवढा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी येथे दिली. मतदारांनी अगदी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गुरुवारी मतमोजणी..
सर्व दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी मतदान होत आहे. महानगरपालिकेच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2 हजार 956 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 5 हजार 167 उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. या सर्व ठिकाणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी मतमोजणी होईल, असेही राज्य निवडणूक आयुक्तांनी नमूद केले.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडकडे सर्वांच्या नजरा
सर्वच दहाही महापालिकांमध्ये यंदा चुरशीची लढत बघायला मिळणार आहे. खासकरून मुंबई महापालिकेत काय होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. कारण तेथे शिवसेना-भाजप यांच्यात थेट लढत बघायला मिळणार आहे. शिवसेना आमची सत्ता येणार असा दावा करत आहेत तर भाजप त्यांना 114 जागा मिळणार असा दावा करत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेची हॅट्ट्रिक साधणार का की, भाजपला संधी मिळेल, याबाबत तर्कवितर्क सुरू होते. तर काहींना या दोन्ही महापालिका त्रिशंकु होईल, असे वाटू लागले आहे.