बारामती : निर्भया पथकाच्यावतीने बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहामध्ये समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये मुलींना निर्भया पथक, त्यांचे ध्येय, स्वसंरक्षण, महिलाविषयक कायदे, गुड टच, बॅड टच, याबाबत माहिती देण्यात आली. तसेच वाहतुकीचे नियम मोडणार्या तरुणांवर कारवाई करण्यात आली.
बारामती उपविभागाच्या निर्भया पथकातील पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, हवालदार शेंडगे, वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी तुळजाराम चतुरचंद कॉलेज, टेक्निकल हायस्कूल, एम. ई. एस. हायस्कूल, पूनावाला गार्डन, सातव चौक, तीन हत्ती चौक या भागात पेट्रोलिंग केले. वाहतुकीचे नियम मोडणार्या सहा प्रकरणांमध्ये 1200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे पंधरा मुलांवर कारवाई करून त्यांच्या पालकांना अशोक धुमाळ यांनी समुपदेशन केले व मुलांना पालकांच्या ताब्यात दिले.
गेल्या सहा दिवसात बारामती शहर पोलिसांनी वाहतूक नियमनासाठी मोहीम उघडली आहे. वेगवेगळ्या चौकात महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अचानकपणे 15 ते 20 जणांचे पथक कारवाई करण्यासाठी सज्ज असते. हे पथक वाहनांच्या तपासणीबरोबरच रोडरोमियोंचा शोध घेत असते. बिगर परवाना वाहनधारक प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र, विमा पॉलिसी इत्यादी कागदपत्रांची तपासणी करत दंडाची कारवाईही करीत आहे. त्यामुळे मोठ्या आवाजात गाडी चालवणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या धडक कारवाईमुळे शहरात चांगलीच शिस्त निर्माण झाली आहे. यापुढेही सातत्याने अशीच कारवाई करावी, अशीही मागणी नागरीक करीत आहेत.