चंडीपूर (ओडिशा) : संरक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात डीआरडीओने मंगळवारी ‘निर्भय’ या सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. निर्भय हे भारतीतील पहिले संपूर्णतः स्वदेशी बनावटीचे लांब पल्ल्याचे सब-सॉनिक अर्थात ध्वनीच्या वेगापेक्षा कमी वेगाने जाणारे तसेच कमी उंचीवरून जाणारे क्षेपणास्त्र आहे.
ओडिशा येथील चंडीपूरच्या क्षेपणास्त्र चाचणीस्थळावर ही चाचणी घेण्यात आली. निर्भय क्षेपणास्त्र ताशी 164 किलोमीटर इतक्या वेगाने समुद्रसपाटीपासून केवळ 100 मीटर इतक्या उंचीवरून मारा करू शकते. चाचणीतील सर्व टप्पे निर्भय क्षेपणास्त्राने यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे व संचाचे अभिनंदन केले आहे. या चाचणीच्या यशाबाबत आपल्याला आधीपासूनच खात्री होती, असे सीतारामन् यावेळी म्हणाल्या. या चाचणीमुळे भारत सब-सॉनिक क्षेपणास्त्रांचे जटील तंत्रज्ञान असणार्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. या चाचणीवेळी डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफर, महासंचालक डॉ. सी. पी. रामनारायणन् यांच्यासह अन्य अधिकारी व शास्त्रज्ञ उपस्थित होते.