निर्भायाच्या आरोपींचा दया अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला; मात्र फाशी २२ ला नाही !

0

नवी दिल्ली: दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात येणार हे निश्चित झाले आहे. चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हा अर्ज फेटाळला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळून लावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १४ दिवसांचा कालावधी नव्या डेथ वॉरंटसाठी द्यावा लागेल. त्यामुळे या चौघांना २२ जानेवारी रोजी फाशी दिली जाण्याची शक्यता कमी आहे.

निर्भायाच्या दोषींना २२ जानेवारीला फाशी देण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयाने दिला होता. डेथ वॉरंटमध्ये २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता या चारही दोषींना फाशी देण्यात येणार असल्याची बाब नमूद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मुकेशने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. आता हा अर्जही राष्ट्रपतींनी फेटाळून लावला आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रपती कार्यालयाकडून केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवण्यात आलं आहे.