नवी दिल्लीः दिल्लीतील निर्भया प्रकरणाने संपूर्ण देश हादरले होते. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फेब्रुवारीत बलात्कारातील आरोपींना फाशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान दोषींपैकी एक असलेल्या मुकेशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका आज बुधवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. राष्ट्रपतींच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करीत मुकेशने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावल्याने आता दोषी मुकेशच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी राष्ट्रपतींनी मुकेशची दया याचिका फेटाळून लावली होती. याविरोधात मुकेशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
निर्भया प्रकरणातील चार आरोपींपैकी एक मुकेश आहे. त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. परंतु, राष्ट्रपतींनी त्याची दया याचिका फेटाळून लावली होती. राष्ट्रपतींनी ही याचिका का फेटाळली याचा न्यायिक तपास करण्यात यावा, अशी मागणी करीत मुकेशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मंगळवारी मुकेशकडून वकील अंजना प्रकाश यांनी ही याचिका दाखल केली होती. राष्ट्रपती यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रे समोर ठेवण्यात आली नाही. दया याचिका फेटाळण्यात घाई करण्यात आली असा दावा मुकेशने याचिकेतून केला होता. निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंहची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली होती. त्याला त्याने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने निर्भया प्रकरणातील दोषींसाठी फाशीची कोणती तारीख निश्चित केली आहे? डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे का?, असे प्रश्न सुप्रीम कोर्टाकडून तिहार कारागृहाला विचारण्यात आले असून त्यावर कारागृह प्रशासन आज उत्तर देणार आहे.