पुणे : राज्य शासनामार्फत देण्यात येणारा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना, तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी याबाबतची घोषणा केली. 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त ही घोषणा करण्यात आली. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.
संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिका
मुळच्या मुंबईच्या असलेल्या निर्मला गोगटे यांनी पं. कृष्णराव चोणकर, प्रो. बी. आर. देवधर यांच्याकडून आवाज साधना शास्त्राचे विशेष मार्गदर्शन घेतले. सुरुवातीच्या काळात महिला कला संगम या स्त्रियांच्या संगीत नाटकातून त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. मुंबईच्या साहित्य संघ मंदिर या संस्थेमार्फत व्यावसायिक रंगभूमीवर मास्टर दामले, सुरेश हळदणकर, प्रसाद सावकार, नानासाहेब फाटक, राम मराठे, रामदास कामत, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. व्यावसायिक रंगभूमीबरोबरच त्यांनी अनेक संस्कृत नाटकांतही भूमिका केल्या. भारतात तसेच परदेशात आकाशवाणी व दूरदर्शनवरुनही त्यांनी गायनाचे कार्यक्रम केले आहेत.
पार्सेकर मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार
बाबा पार्सेकर हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार आहेत. हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा रंगभूमीच्या तिन्ही प्रकारांमध्ये बाबांनी दैदिप्यमान कामगिरी केली. मुंबईच्या जे. जे. कला महाविद्यालयातून प्लाईड आर्टची पदवी घेतल्यानंतर बाबा पार्सेकरांनी प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांच्याबरोबर राहून बाबांनी भारतीय विद्या भवनाच्या एकांकिकांना नेपथ्य करु लागले. यानंतर विजया मेहता यांच्याकडूनही काही काळ मार्गदर्शन घेतले. ललितकला साधना संस्थेतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. सुरेश खरेंच्या सागर माझा प्राण या नाटकाचे वैशिष्टयपूर्ण नेपथ्य बाबांचे होते. आत्तापर्यंत त्यांनी 485 नाटकांचे नेपथ्य केले आहे.
20 नोव्हेंबर रोजी बोरीवली येथे पुरस्कार सोहळा
या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना 20 नोव्हेंबर रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, प्रा. मधुकर तोरडमल, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक आणि लीलाधर कांबळी यांना प्रदान करण्यात आला आहे. तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी फैय्याज, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, कीर्ती शिलेदार, रजनी जोशी आणि चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर यांना प्रदान करण्यात आला आहे.