पाचोरा । निसमाजात निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्यावतीने 22 ते 24 सप्टेंबर या काळात सीबीएसई (नवी दिल्ली) यांचे अंतर्गत 17 व 19 वयोगटातील महाराष्ट्र व गोवा राज्यातील मुला मुलींच्या कबड्डी- सांघीक स्पर्धा आयोजित केल्याची माहिती स्कुलच्या मॅनेजमेंट व संस्थापकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. संस्थेच्या संस्थापिका वैशाली सुर्यवंशी, सेक्रेटरी नरेंद्रसिंग सुर्यवंशी व प्राचार्य भगवान सावंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. निर्मल फाऊंडेशन संचलित निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत सीबीएसई अंतर्गत महाराष्ट्र व गोवा राज्यातील 17 व 19 वयोगटातील मुले व मुलींच्या कबड्डी सांघीक स्पर्धा मोठ्या स्वरूपात राज्यस्तरावर शाळेच्या भव्य प्रांगणात होणार आहेत. राज्यात व जिल्ह्यात प्रथमच पाचोर्यात ह्या स्पर्धा मॅटवर होणार असून स्पर्धेसाठी सुमारे अडीच लाखांची मॅट नव्याने खरेदी केली आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने रितसर परवानगी घेतली आहे.
खेळाडूंसाठी सर्व सुविधा उपलब्ध
शाळेच्यावतीने क्रीडांगणावर दोन मॅटवर सकाळी 7 ते 12 दुपारी 4 ते 7 वेळेत ह्या स्पर्धा घेतल्या जातील. कबड्डी असो. चे प्रशिक्षित 16 पंच, 1 निरीक्षक, 1 पंचप्रमुख स्पर्धकांच्या खेळ कौशल्याचे निरीक्षण करून निर्णय घेतील. खेळाडूंना स्टेशनपासून ते शाळेपर्यंत नेण्या व आणण्यासाठी स्वतंत्र बसेसच्या व्यवस्था केली आहे. तर स्पर्धे दरम्यान खेळतांना खेळाडूंना इजा होणार नाही आणि झालीच तर यासाठी दोन तज्ज्ञ डॉक्टरांची टिम तैनात राहील. जिल्ह्यात व पाचोरा नगरीत पहिल्यांदाच सीबीएसई अंतर्गत फक्त निर्मल इंटरनॅशनल स्कूल यांनाच ह्या राज्यस्तरीय स्पर्धांचा बहुमान मिळाल्याचा आनंद व आत्मविश्वास संस्थेच्या संस्थापिका वैशाली सुर्यवंशी यांनी बोलून दाखविला. ह्या स्पर्धेसाठी शाळेच्यावतीने विविध समित्या तयार करण्यात आल्या असून स्पर्धेसाठी सर्वच उत्साही आहेत. नियोजन अतिषय चांगल्या स्वरूपात करण्यात आले आहे. कोणतीच कमतरता जाणवणार नाही. स्पर्धा उद्घाटन आमदार किशोर पाटील यांचेहस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ. आर.ओ. तात्या पाटील भूषविणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूरचे डॉ. बाबासाहेब उलपे, जिल्हा कबड्डी असो. चे पदाधिकारी, नितीन बर्डे, चंद्रकांत सोनार, आदींची उपस्थिती लाभणार आहे. सदर स्पर्धा पाहण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पाल्यांनी व पंचक्रोशीतील क्रिडा जगतातील आजी – माजी खेळाडूसह नागरिकांनी उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजक निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने करण्यात आले आहे. एकूण 32 शाळांचे 56 संघातील सुमारे 672 मुल व मुली ह्या स्पर्धेत सहभाग घेतील.