पुणे । गणेशोत्सवात निर्माल्य व्यवस्थापनासाठी पुण्यातील तीन रोटरी क्लबने पुढाकार घेतला असून पालिकेच्या सहकार्याने शहरात प्रथमच 27 ऑगस्टपासून निर्माल्य खत निर्मिती प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती रोटरी क्लबच्या वतीने पुणे रोटरी वॉटर कमिटी प्रमुख व जलप्रेमी सतीश खाडे यांनी दिली आहे.
गणेशपूजा, आरतीसाठी सार्वजनिक मंडळे आणि घरांमध्ये शेकडो टन फुले, दुर्वा वापरल्या जातात. त्याचे विसर्जन गणपतींबरोबर केले जाते. पालिकेतर्फे या निर्माल्याचे नदीत विसर्जन होऊन ती प्रदूषित होऊ नये, म्हणून जागोजागी घाटांवर, पुलांवर निर्माल्य कलश उभारले जातात. या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माल्यातून खत निर्मिती करून पालिका हद्दीतील बागांमध्ये खत वापरण्यात येणार आहे.
या प्रकल्पात निर्माल्याचे श्रेडरद्वारे बारीक तुकडे करून कंपोस्ट खत केले जाणार आहे. रोटरीने देणगीतून मिळवलेल्या या श्रेडरला पु.ल. देशपांडे उद्यानात पालिका जागा देणार आहे. प्रतिदिन दोन टन क्षमता असलेला हा श्रेडर गणेशोत्सव काळात अखंड कार्यरत राहील.यासाठी रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड, रोटरी क्लब ऑफ युवा, रोटरी क्लब ऑफ एनआयबीएम या 3 रोटरी क्लबनी पुढाकार घेतला आहे. यासाठी नुकतीच पालिकेत घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश जगताप व महापौर मुक्ता टिळक या पदाधिकार्यांसमवेत बैठक होऊन या प्रकल्पाला संमती देण्यात आली, असे सतीश खाडे यांनी सांगितले.