निर्यातमूल्य हटविले, कांदा वधारला!

0

कोसळणारा कांदाबाजार सावरला, उच्चप्रतीच्या कांद्याला 2001चा भाव

नाशिक/पुणे : आठवडाभरापासून बाजारभाव कोसळणार्‍या कांदाउत्पादक शेतकर्‍यांना केंद्रातील मोदी सरकारने शनिवारी अखेर दिलासा दिला आहे. सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केली असून, त्यामुळे कांद्याचे भाव सावरले आहेत. आशियाखंडातील सर्वात मोठ्या लासलगाव कांदा बाजारात उच्चप्रतीच्या कांद्याला 2001चा भाव मिळाला आहे. पुणे बाजार समितीतही चांगले दर मिळण्यास सुुरवात झाली असून, कांद्याची आवकही वाढली आहे. यापूर्वी 19 जानेवारीरोजी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने देशांतर्गत बाजारपेठेतील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातमूल्य 800 डॉलरऐवजी 750 डॉलरपर्यंत कमी केले होते. त्याचवेळी या दराचा फेब्रुवारीत आढावा घेण्याचे सांगितले होते. त्यानुसार, फेरआढाव्यात हे निर्यातमूल्य हटविण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे निर्यात वाढून कांद्याला चांगला दर मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

कांद्याचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात
केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भाग, शेतकरीवर्गासाठी चांगल्या घोषणा करणार्‍या मोदी सरकारने निर्यातमूल्य हटवून कांदाउत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. वाणिज्य मंत्रालयाने 2 फेब्रुवारीरोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या नियमात सुधारणा करून पुढील सूचना जारी होईपर्यंत निर्यातमूल्य शून्य राहणार असल्याचे या अधिसूचनेत नमूद केले आहे. कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. लासलगाव या सर्वात मोठ्या कांद्याच्या बाजारपेठेत 3700 रुपयांचा उच्चांक गाठलेला कांदा झपाट्याने खाली आला होता. कांद्याचे दर निम्म्यावर आल्याने नाशिक, नगर, पुणे या कांदाउत्पादक पट्ट्यातील शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे कांद्याचे निर्यातमूल्य हटवावे, अशी मागणी जोर धरत होती. केंद्राने निर्यातमूल्य हटविल्यानंतर लासलगावसह पुणे बाजार समितीतही कांद्याचे दर वाढण्यास सुुरवात झाली आहे.

आता निर्यातीला चालना मिळणार
स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात कांद्यावरील निर्यातमूल्य दर 850 डॉलर प्रतिटन केले होते. या लादलेल्या अघोषित निर्यातबंदिमुळे मोठा फटका बसला होता. कांदा भावात मोठी घसरण होत असल्याने कांदा उत्पादक चिंताग्रस्त झाला. मात्र कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्ण रद्द झाल्याने कमी झालेल्या कांदा निर्यातीला चालणा मिळणार आहे. निर्यातमूल्य शून्यावर आल्याने चीन, पाकिस्तान, श्रीलंका या देशांबरोबर स्पर्धा करता येणार असून, बाजारभाव स्थीर राहण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले. रविवारी बाजार समित्या बंद असल्याने सोमवारनंतर बाजारभाव आणखी वाढतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.