निलेशचा कानपूरात कसून शोध

0

भुसावळ। कानपूरातील सुभाष चिल्ड्रन होममधून गणपत भिल्लचा ताबा मुक्ताईनगर पोलिसांच्या पथकाने घेतल्यानंतर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेता नीलेश भिल्लचा कानपूरात कसून शोध सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी पथकाने दिवसभरात कानपूरातील विविध पोलीस ठाण्यांसह रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म तसेच कानपूर व कल्याणपूर शहरातील सर्वच रिमांड होममध्ये नीलेशचा शोध घेतला मात्र तो आढळला नाही, अशी माहिती तपासाधिकारी उपनिरीक्षक वंदना सोनुने यांनी दिली. गणपत सापडल्यानंतर कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नसलातरी मोठा मुलगा नीलेश मात्र बेपत्ता असल्याने आई सुंदरबाई रेवाराम भिल्ल या मुलाच्या विरहाने कावर्‍या-बावर्‍या झाल्या आहेत. पोलिसांसोबत त्याही मुलाचा शोध घेत आहेत.

गणपतच्या बोलण्यात विसंगती
तब्बल 92 दिवसांपासून हरवलेल्या गणपतची पथकाने चौकशी केल्यानंतर त्याच्या माहितीत विसंगती आढळून येत आहे. सुरुवातीला त्याने कानपूरापर्यंत दोघेही भावंडे 24 जुलैपर्यंत सोबत असल्याचे सांगितले होते मात्र नंतर तो एका प्लॅटफार्मवर उतरल्याचे सांगतो व तेथून नीलेशला पोलिसांनी पकडले व आपण मात्र रेल्वेत संपूर्ण दिवसभर प्रवास करून कानपूरात पोहोचलो, अशीदेखील माहिती देत असल्याचे सूत्रांनी सांगितले मात्र नेमके खरे काय घडले? हे नीलेशचा पत्ता लागल्यानंतरच कळणार आहे. शनिवारी पोलीस पथक परतीच्या प्रवासात निघणार असून येताना भोपाळ व मध्यप्रदेश पोलिसांना नीलेशबाबत सूचित करण्यात येणार आहे.