निवडणुकांच्या पराभवानंतर मनसेमध्ये नवी फेररचना

0

मुंबई : लागोपाठच्या निवडणुकीत उडालेली दाणादाण आणि संघटनात्मक पातळीवर आलेला विस्कळीतपणा, यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला कमालीची मरगळ आलेली आहे. अनेक ज्येष्ठ सहकारी राज ठाकरे यांना सोडून गेले आहेत आणि मतदारही दुरावला आहे. त्यामुळे निवडणुकांकडे पाठ फिरवून संघटनात्मक कामावर भर देण्याचा विचार पुढे आला आहे. नाराज वा निष्क्रिय नेते कार्यकर्त्यांना जवळ व विश्वासात घेऊन, नव्या दमाने उभे रहाण्याचा निश्‍चय राज यांनी केल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीपुर्वी काही आमदार अन्य पक्षांत निघून गेले होते, तर काही जणांनी विधानसभेतील पराभवानंतर पक्षाकडे पाठ फिरवली. अनेकजण पुढल्या काळात पक्षाच्या निष्क्रियतेने कंटाळून बाजूला झाले. अलीकडेच शिशिर शिंदे यांच्यासारखा खंदा लढवय्या कार्यकर्ता नेताही बाजूला झाला. त्यामुळे मनसेचे भवितव्य काय, असे प्रश्‍न विचारले जाऊ लागले. दरम्यान, राज यांचा पुत्र गंभीर आजारात असल्याने त्यांना महापालिका निवडणुकीतही पूर्ण शक्तिनिशी झोकून देता आलेले नव्हते. आता त्यातून मोकळा वेळ मिळाल्यावर राज यांनी मुळापासून आरंभ करण्याचा निर्धार केल्याचे वृत्त आहे.

गेल्या दोन वर्षांत मनसेला कमालीची मरगळ आलेली होती. पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट रोखण्याच्या खेरीज, अन्य कुठल्याहीबाबतीत मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला नव्हता. करण जोहर वा शाहरुखच्या चित्रपटांविषयी वाद झाल्यावर मनसेचा गाजावाजा झाला होता. पण त्याचाही पुरता राजकीय लाभ, त्या पक्षाने निवडणुकीत उठवला नाही. साहजिकच मनसे संपल्याची चर्चा सुरू झाली होती. आता त्यातून बाहेर पडायला राज ठाकरे सज्ज होत असल्याचे वृत्त आहे.