निवडणुका एकाचवेळी व्हाव्यात!

0

नवी दिल्ली : प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याची शक्ती देशाच्या राज्यघटनेत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 68 व्या संविधान दिनानिमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी करण्याच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले. वेगवेगळ्या निवडणुका घेतल्या की कोट्यवधी रुपये खर्च होतो आणि देशावर त्याचा आर्थिक भार पडतो. त्यामुळे या दोन्ही निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबत आता चर्चा हवी आहे. ते म्हणाले, आपली राज्यघटना जितकी जीवंत आहे, तितकीच संवेदनशील आहे. आज असा एकही मुद्दा नाही, ज्यावर राज्यघटनेत दिशानिर्देश नाही. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, की राज्यघटना लवचिक आहे. शांती असो की युद्ध, देशातली एकजुट कायम राखण्याची ताकद राज्यघटनेत आहे.

दुसरीकडे, आपल्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी 26/11 हल्ल्याच्या घटनेचे स्मरण केले. ते म्हणाले, 26/11 हा संविधान दिवस आहे. याच दिवशी 9 वर्षांपूर्वी देशावर भयंकर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात जे बळी पडले होते त्यांच्याप्रती आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या बलिदानाला देश कधीही विसरु शकत नाही. या हल्ल्यात पोलिस आणि सुरक्षा दलातील कर्मचारी शहीद झाले. याशिवाय, निष्पाप नागरिकही मृत्युमुखी पडले. दहशतवादाने जागतिक मानवतेला आव्हान दिले आहे. याविरोधात भारतच नव्हे तर जगातील सर्व मानवतावादी शक्तींनी एकजूट दाखवावी, असे आवाहनही मोदींनी केले.

मातीचे महत्त्व ओळखा!
मोदी म्हणाले, मला हे जाणुन आनंद झाला की, 5 डिसेंबररोजी सॉईल कंझर्व्हेशन डे आहे. पृथ्वीचा माती हा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. माती नसली तर जीव, जंतू, झाडे काहीच असणार नाही. काही शेतकरी याप्रती जागरुक होताना दिसत आहेत. रसायनिक खतांनी मातीची उत्पादकता कमी होते. त्यामुळे ते आता जैविक खते वापरण्याला प्राधान्य देत आहे. तसेच दिव्यांगाविषयी मोदी म्हणाले, दिव्यांग कोणापेक्षाही कमी नाही. मध्यप्रदेशमध्ये 8 वर्षांच्या तुषारने गाव पाणंदमुक्त करुन दाखवले आहे. त्याने शिटी वाजवून लोकांना उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखले.