मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री फक्त निवडणुकीपुरता शेतकऱ्यांचा वापर करतात आणि निवडणुका झाल्या की त्यांना वाऱ्यावर सोडतात असे दुर्देवी चित्र सध्या राज्यात दिसत आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केली.
दिल्ली दौऱ्यावर जाऊन आपण तूर खरेदीसाठी एक महिन्याची मुदतवाढ आणली, असा गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने तुरीचे पीक चांगले आले आहे. मात्र राज्यातल्या तुरीच्या उत्पादनाला भाव मिळत नाही. नाफेडची बहुतांशी तूर खरेदी केंद्रे बंद आहेत. जी चालू आहेत तिथे बारदाने उपलब्ध नाहीत, अशी फुटकळ कारणे देऊन शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही. नाफेडच्या खरेदी केंद्रावरही हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे, असे ते म्हणाले.
तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आहेत. पण खरेदी बंद असल्याने नाईलाजाने खासगी व्यापाऱ्याला माल विकण्याशिवाय शेतकऱ्यापुढे पर्याय राहिला नाही. याचा गैरफायदा घेऊन व्य़ापारीही तुरीचे भाव पाडून खरेदी करत आहेत. गेल्या अडीच वर्षांमध्ये अशाच अनास्थेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एकट्या मराठवाड्यात गेल्या दोन महिन्यात ११७ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. परिस्थिती इतकी गंभीर असतानाही सरकारचे डोळे उघडले जात नाहीत. मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरासाठी तूर खरेदीला मुदतवाढ दिली अशा वल्गना न करता शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल याकरिता प्रयत्न करावेत, असे सावंत म्हणाले.