* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांचा भाजप-शिवसेनेला इशारा
खास प्रतिनिधी (या सदिच्छा भेटीचा व्हिडीओ शेवटी पहा)
पिंपरी-चिंचवड : शास्तीकर माफ करणे, अनधिकृत बांधकामे वैध करणे आदींबाबत राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप, शिवसेनेच्या आमदारांनी पिंपरी-चिंचवडकरांना आश्वासने दिली होती. या आश्वासनांचे पुढे काय झाले? आता राज्य सरकारने शास्तीकर माफीबाबत अत्यंत फसवा असा अध्यादेश काढला आहे, तो शहरवासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. सरकारने निवडणुकीआधी पूर्णपणे शास्तीकर माफ करण्याची घोषणा करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरात ‘खळ्ळ खट्ॅक’ असे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडेल, असा खणखणीत इशारा मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखलेे यांनी दिला. आगामी महापालिका निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर आणि लोकांच्या प्रश्नावर मैदानात उतरणार आहोत. पक्षाला शहरात अनुकूल वातावरण असून, भाजप अन् राष्ट्रवादीतील ‘माकडउड्यांना’ शहरवासी अजिबात भीक घालणार नाही. जनतेनेही एकवेळ आम्हाला संधी देऊन पहावी, विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ, असेही चिखले यांनी निक्षून सांगितले. चिखले यांनी मंगळवारी ‘दैनिक जनशक्ति’च्या मुख्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘जनशक्ति’चे व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी, निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे, सरव्यवस्थापक हनुमंत बनकर, सहाय्यक संपादक (कार्पोरेट) अविनाश म्हाकवेकर, जाहिरात व्यवस्थापक अमित शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी चिखले यांनी समूह संपादक कुंदन ढाके यांचीही भेट घेऊन चर्चा केली.
शिवसेनेसोबत ‘टाळी वाजली’ तर दोघांनाही फायदा!
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती व्हावी, यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात बोलताना सचिन चिखले म्हणाले, मुंबईसह पिंपरी-चिंचवड महापालिकेतही मनसे अन् शिवसेनेची युती व्हावी, अशी आमची अपेक्षा राहील, तथापि अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे हेच घेतील. या दोन पक्षांची युती झाली तर दोन्ही पक्षांना त्याचा निवडणुकीत निश्चितच फायदा होईल. आज भाजप अन् राष्ट्रवादीत नुसत्या ‘माकडउड्या’ पडत आहेत. या दोन्ही पक्षातील लढत ही खरे तर राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी अशीच आहे. जे भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, तेच खरे शहरातील भ्रष्टाचारी आहेत. शहरवासीयांच्या लक्षात सर्व काही आलेले असून, जनता यांना मतदानयंत्रातूनच धडा शिकवेल. अनधिकृत बांधकामे नियमित करू, रेडझोनचा प्रश्न सोडवू, शास्तीकर पूर्णपणे माफ करू, अशी आश्वासने भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली होती. त्याचे पुढे काय झाले? आ. लक्ष्मण जगताप असो, आ. महेश लांडगे असो किंवा शिवसेनेचे आ. गौतम चाबुकस्वार असो कुणीही आपले आश्वासन पाळले नाही. जे भ्रष्टाचारी आहेत ते आता भाजपात जात आहेत अन् राष्ट्रवादीवर आरोप करत आहेत. निवडणुकांच्या तोंडावर लोकांना मूर्ख बनविण्याचे काम ही मंडळी करत आहेत, त्यांच्या भुलथापांना शहरवासी अजिबात बळी पडणार नाही, असेही चिखले यांनी स्पष्ट केले.
शहरात पक्ष मजबूत, आमच्याकडे नव्या दमाचे कार्यकर्ते
अनंत कोर्हाळे, दीपक मोढवे पक्षातून बाहेर पडले काय किंवा अन्य कुणी पक्षाचे काम थांबवले काय? या लोकांच्या जाण्यामुळे पक्षावर काहीही परिणाम पडणार नाही. ही मंडळी कधीच मनसेची किंवा राज ठाकरे साहेबांची नव्हती. याच लोकांनी वारंवार राजसाहेबांकडे चुकीचे रिपोर्टिंग केले, त्यामुळे पक्ष वाढण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही मंडळी पक्षातून बाहेर पडली ते एकप्रकारे योग्यच झाले. आता पक्षाकडे नव्या दमाचे कार्यकर्ते असून, ते जोरात पक्षाचे काम करत आहेत. सोमवारी इच्छुकांच्या मुलाखती झाल्यात, त्याला तब्बल १२५ इच्छुकांनी हजेरी लावली व मुलाखती दिल्यात. या शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अन् शिवसेनेचे अनेक आजी-माजी नगरसेवकही आमच्या संपर्कात आहेत. त्या पक्षांकडे तिकाटासाठी भाऊगर्दी सुरू आहे. त्यामुळे ही मंडळी आता आमच्याकडे पर्याय म्हणून पाहात आहेत. आम्ही त्यांचाही विचार करत आहोत. या निवडणुकीत पक्षाला चांगले वातावरण असून, १५ प्रभागांत आमची ताकद मोठी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून सत्तेची चावी ही मनसेकडेच असेल, असेही चिखले यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंची सभा व रोड शो होणार!
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे रोड शो शहरात होणार असून, सभाही घेतली जाणार आहे. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. या शिवाय, रणजीत शिरोळे व गणेश सातपुते हे पक्षाचे संपर्कप्रमुखदेखील पक्षाच्या विजयासाठी रणनीती आखत आहेत. पूर्वी राजसाहेब यांनी या शहराकडे लक्ष दिले नव्हते. आता ते स्वतः या शहराकडे लक्ष ठेवून असून, नाशिकमधील गोदापार्कच्या धर्तीवर शहरातील इंद्रायणी, मुळा, मुठा नद्यांच्या सौंदर्यीकरणासाठीही आम्ही पुढाकार घेणार आहोत. शहराचा सर्वांगिण विकास हाच आमचा निवडणूक मुद्दा असून, आम्ही याच मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असेही चिखले यांनी सांगितले. भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाबाबत आपण वारंवार पाठपुरावा केला. त्यासाठी प्रारुप आराखडाही सादर केला. त्यासाठी १२० कोटी रुपयांचे बजेट प्रस्तावित होते. परंतु, आपल्याला श्रेय मिळू नये, यासाठी राष्ट्रवादीने हा पूल रखडवला आहे. या पुलासाठी कमी रकमेची निविदा मंजूर झाली असून, निवडणुकीपूर्वी भूमिपूजनाचा नारळ फुटणे अशक्य आहे. या पुलाचे काम आता लवकर झाले नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही चिखले यांनी दिला.
शहराचा कायापालट करणार!
शिक्षण, पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व रस्ते, प्रदूषण या विषयांवर महापालिकेत सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यंत नुसतीच पैशाची उधळपट्टी केली. जनतेच्या पैशावर दौरे केले व मौजमजा केली. आज शहरात गोरगरिबांसाठी इंग्रजी व चांगल्या शिक्षणाची सोय नाही. महापालिकेच्या शाळांवर मोठ्या प्रमाणात खर्च झालेला दिसतो, परंतु शाळांची आजही दुरवस्था आहे. शहरवासी व्याजाने पैसे काढून मुलांना चांगल्या शाळेत घालून वारेमाप फी भरत आहेत. गोरगरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, शहरातील प्रदूषण दूर होऊन पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात, चांगले रस्ते व रस्त्यांवरील वाहनांची दाटी कमी व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार आहे, असे सांगून सचिन चिखले म्हणाले, की बीआरटी मार्गासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात पैसा दिला परंतु, अद्यापही बीआरटी मार्गावर शहर बस धावू शकल्या नाहीत. ज्या बस धावत आहेत, त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही मोठा आहे. मनसेकडे सत्ता आली तर या सर्व पायाभूत सुविधांवर आम्ही काम करू, विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ, विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला राजकारण करायचे नाही, परंतु, शहराचा केवळ दिखाऊ विकास करण्यापेक्षा मूलभूत विकासावर आम्ही काम करणार आहोत. राष्ट्रवादी विकासाचा दावा करत असेल तर शहराच्या मोठ्या भागात अद्यापही विकास पोहोचलेला नाही. काल राष्ट्रवादीत असलेली माणसे आज भाजपात जात आहेत. याच माणसांनी भ्रष्टाचार केला ते आज भाजपात जाऊन पवित्र झालीत काय? असा सवालही चिखले यांनी उपस्थित केला.
माझा जन्मच मनसेसाठी झाला!
मी राज ठाकरेसाहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. नगरसेवक म्हणून माझ्या प्रभागातील जनता मला आणि माझ्या पत्नीलाच निवडून देणार आहेत, यात काहीही शंका नाही, शेवटी आम्ही दोघांनी लोकांची सेवा केली आहे. उद्या कोणत्याही पक्षाने आवतण दिले तरी मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही, असे सांगत सचिन चिखले म्हणाले, की जे ग्रामीण भाग शहरात दाखल झाले त्यांच्या विकासाकडे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच दुर्लक्ष केले. त्या भागाचाही विकास व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. विकासाच्या बाबतीत महापालिकेचे अधिकारी आडवे येत असतील, लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असतील तर आम्ही खास मनसेस्टाईल त्यांना धडा शिकविण्यासही मागेपुढे पाहणार नाही. त्यासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आहे, असेही चिखले यांनी निक्षून सांगितले. महापालिका निवडणूक मनसेसाठी महत्त्वपूर्ण असून, आम्ही पूर्ण ताकदीने ती लढविणार आहोत. प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार देणार आहोत. आमच्या पक्षात यापूर्वी जे कामचुकार, प्रसिद्धीपिसाट अन् पैसे खाणारे मंडळी होती, ती आता बाहेर पडली आहे. आता पक्षाकडे प्रामाणिक नेते अन् कार्यकर्ते राहिले असल्याने शहरवासी नक्कीच आम्हाला सत्तेची एक संधी देतील, असा विश्वासही चिखले यांनी व्यक्त केला.
सचिन चिखले यांच्या मुलाखतीचा पहा हा सविस्तर व्हिडीओ.