पिंपरी-चिंचवड/पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 10 महानगरपालिका आणि 11 जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला राजकीय पक्षांचा प्रचार रविवारी सायंकाळी पाच वाजता समाप्त झाला. त्यामुळे गेले महिनाभर राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आचारसंहितेत निवडणुकीचा प्रचार जाहीरपणे करता येत नाही. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्ष झाडून कामाला लागल्याचे पहायला मिळाले. उमेदवारांनी पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटी, कोपरा सभा आदींवर भर दिला. तर, पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी शेवटच्या सभेत पक्षाचा अजेंडा, आश्वासनांची मतदारांवर खैरात केली. तर, विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. आता मंगळवारी, 21 फेब्रुवारीला थेट मतदान आणि त्यानंतर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. प्रचार संपल्यामुळे गेले महिनाभर राज्यातील नागरिक आणि मतदारराजाला पहायला मिळालेल्या आधुनिक महाभारताचा शेवट झाला.
राजकीय पक्षांचे एकमेकांवर हल्ले, आता मतदारांचा कौल महत्वाचा!
गेले महिनाभर राज्यात निवडणुकीचा ज्वर वाढला होता. सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर टीका करताना सर्व मर्यादा ओलांडल्या. राजकीय आरोपांपासून व्यक्तिगत आरोपांपर्यंत ते एकमेकांची संपत्ती जाहीर करण्याचे आव्हान देण्यापर्यंत आणि एकमेकांची औकात काढत एकमेकांना पाहून घेण्यापर्यंतची सर्व आव्हाने-प्रतिआव्हाने राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एकमेकांना देताना जनतेने पाहिले. आता हे सर्व रामायण, महाभारत झाल्यावर मतदारराजा नेमका काय विचार करतो आहे, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. राजकीय पक्षांनी कितीही आश्वासने दिली. आमिषे दाखवली तरीही, मतदारराजा त्याच्या मनात जे असते तेच तो करतो असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे याही वेळी प्रत्यक्ष निकालच वास्तव काय ते दाखवून देणार आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर हल्ला चढवला. भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसेने पालिकेतील भ्रष्टाचाराला राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला. शिवसेना, भाजपने पालिकेची सत्ता काबीज करणार असल्याचा दावा केला असून, राष्ट्रवादीनेही पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
आजची रात्र महत्वाची!
दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीचा पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी मतदान झाले. या टप्प्यात सुमारे 69 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता याही टप्प्यात विक्रमी मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शेवटच्या काही तासांत किंवा मतदानाच्या आदल्या रात्री उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर आमिषे दाखवली जातात. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोसायट्या, इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये साड्या, धान्य, पैसे आणि भेटवस्तूंचे वाटप मोठ्या प्रमाणात होते. हे सर्व आता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची रात्र आयोग व राजकीय पक्षांना जागता पहारा ठेवावा लागणार आहे. राजकीय पक्षांच्या या काळ्या कामाची निवडणूक आयोगाला आगोदरच कुणकुण लागल्याने आयोगही सज्ज झाला आहे. अशा गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने स्टॅटिक पथके, भरारी पथके, व्हिडिओ सर्व्हेलियन्स पथके तैनात केली आहेत.