निवडणुकीच्या तोंडावर रडगाणे गाऊ नका – नितीन गडकरी

0

नवी दिल्ली : भाजप खासदारांनी निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांना उशीर झाल्याचे रडगाणे गाऊ नका, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात बुधवारी झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत गडकरी बोलत होते. मतदारसंघात कामं झाली नसल्याचे रडगाणे बंद करा. त्याऐवजी जनतेसमोर सरकारच्या कामाबाबत सकारात्मक बोला. विरोधी पक्षात असतानाही कामं झाली नसल्याची रडगाणी असायची, आताही तुम्ही तेच करत आहात. मात्र, आपण विरोधी पक्षात नाही तर सत्तेत आहोत, याचे भान ठेवा, अशी तंबीही नितीन गडकरी यांनी बैठकीत दिली.

तर दुसरीकडे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही भाजपच्या खासदारांना युतीच्या समीकरणाचा विचार न करता कामाला लागण्याचे आदेश दिले. सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या २५ जानेवारी पूर्वी बैठका घेऊन समस्या जाणून घ्याव्यात. तसेच २०१९ ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच होईल, असेही अमित शहा यांनी सांगितले.