निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर नजर

0


निवडणूक खर्च निरिक्षकांनी घेतला आढावा

जळगाव- येत्या विधानसभा निवडणूक कालावधीत उमेदवारांच्या सभा, बैठका, रॅलीसोबतच इतर प्रत्येक खर्चावर सर्व संबंधित यंत्रणांनी बारकाईन लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची बाब खर्च अहवालात समाविष्ठ होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश निवडणूक खर्च निरिक्षकांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. दरम्यान,निरिक्षक आज जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आज विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेऊन काही महत्वपूर्ण सुचना दिल्या.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी चोपडा, रावेर व भुसावळचे निवडणूक खर्च निरिक्षक हरीसन न्टोनी, अमळनेर व एरंडोलचे बिस्वनाथ दास, चाळीसगाव व पाचोराचे अनंथ आर, जामनेर व मुक्ताईनगरचे खर्च निरिक्षक देवाशीष पॉल, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सी. पंडित, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणदिवे यांचेसह निवडणूक खर्च निरिक्षकांचे संपर्क अधिकारी विलास पाटील, तुषार चिनावलकर, श्री.आर.एस. परदेशी, श्री. एस. एस. भंगाळे यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते.

वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश
याप्रसंगी निवडणूक खर्च निरिक्षक यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलीस, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच जिल्ह्यात नेमण्यात आलेले फ्लाईग स्कॉड, व्हीडीओ सर्व्हिलन्स टीम, स्थिर निगराणी पथके यांनी वाहनांची तपासणी करावी. निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सभा, बैठकांची माहिती घेऊन त्यानुसार पथकांची नेमणूक करावी. विना परवानगी कुठलीही सभा, बैठका होणार नाही याची दक्षता निवडणूक अधिकार्‍यांनी घ्यावी.तसेच प्रचाराच्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सुचनांही त्यांनी यावेळी केल्यात.