नवी मुंबई । शिवसेना नगरसेवक संजू वाडे गुरुवारी सायंकाळी महापालिकेच्या ऐरोली विभाग कार्यालयात लोकांची कामे करत असतानाच त्यांना रवी पुजारी या नावाने धमकीचा फोन आला. फोनवरील व्यक्ती आपण ऑस्ट्रेलियातून बोलत असल्याचे सांगत आहे. याप्रकरणी रबाळेे पोलीस ठाण्यात संजू वाडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
संजू वाडे हे आंबेडकरी चळवळीतील एक नावाजलेले प्रस्थ असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे. भविष्यात त्यांची कोणाला तरी राजकीय अडचण जाणवत असेल. त्यांनीच हे केले असल्याचे ऐरोलीत बोलले जात आहे. 2015 साली झालेल्या पालिका निवडणुकीत ते शिवसेना पक्षाकडून निवडून आले आहेत. पदवीधरांना मार्गदर्शन, ज्येष्ठांसाठी कार्यक्रम, शैक्षणिक मार्गदशन, असे अनेक कार्यक्रम ते सातत्याने राबवत असतात. त्यांचा यापूर्वी गुन्हेगारी वर्तुळाशी संबंध आला नसल्याने राजकीय क्षेत्रातून त्यांना निवडणुकीपासून लांब ठेवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला असल्याचे ऐरोलीत बोलले जात आहे. देवीदास चौगुले यांच्याकडे तुला पाठवून देऊ, अशीही धमकी देण्यात आली आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते, माजी सिडको संचालक, माजी जिल्हाप्रमुख आणि सध्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे ते बंधू होते. काही वर्षांपूर्वी देवीदास चौगुले यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.