निवडणुकीसाठी तीन पथके नियुक्त

0

भुसावळ । तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी महसुल प्रशासन सज्ज झाले आहे. तीन गट आणि सहा गणांतील निवडणुकीसाठी 115 मतदान केंद्र असून 2011 च्या जनगणनेनुसार एक लाख 5 हजार 180 मतदारसंख्या असल्याची माहिती तहसीलदार व सहाय्यक निवडणुक अधिकारी मिनाक्षी राठोड यांनी दिली. यावेळी निवासी तहसीलदार संजय तायडे व कर्मचारी उपस्थित होते. निवडणुकीसाठी सहा झोनल अधिकार्‍यांची नेमणुक केली असून तीन पथकांची नियुक्ती केली आहे.

तहसीलदार राठोड यांनी सांगितले, की जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पालिकेप्रमाणे ऑनलाईन नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करणे अनिवार्य आहे. यासाठी डब्लुडब्लुडब्लु.पंचायतइलेक्शन.महाराष्ट्र.कॉम यावेबसाईटवरुन अर्ज भरता येणार आहे. एकुण एक लाख 5 हजार 180 मतदारांपैकी 56 हजार 279 पुरुष व 48 हजार 901 महिला मतदार आहेत. यातुन भुसावळ व वरणगाव पालिकेतील प्रभाग वगळले आहे.

संकेतस्थळावर भरणार नामनिर्देशनपत्र
राज्य निवडणुक आयोगाने निश्‍चित केलेल्या संकेतस्थळावर उमेदवाराने नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी- 27 जानेवारीला सकाळी 11 वाजेपासून 1 फेब्रुवारीला दुपारी 2.30वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्रांची छाननी व माघारी 2 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजेपासून. छाननीनंतर लगेच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नामनिर्देशनपत्राचा स्विकार किंवा नामंजुर करण्याबात निवडणुक निर्णय अधिकार्‍याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख- 5 फेब्रुवारी. जिल्हा न्यायाधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख- 8 फेब्रुवारी राहील.

जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्यासोबत निवडणुकीसंदर्भात एक बैठक नुकतीच पार पडली असून आचारसंहितेचे पालन करण्याबाबत सक्त सुचना करण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचा भंग केला तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आचारसंहितेचे पालन होते की नाही यासाठी फिरे पथक, छायाचित्र पथक आणि तपासणी पथकांद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे.

अपिलानंतर यादी
जिल्हा न्यायाधीशांनी अपील निकालात काढल्यानंतर वैध उमेदवारांची यादी 8 फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाईल. जेथे अपील नाही तेथे नामनिर्देशनपत्र 7 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत व अपील असेल तर 10 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत मागे घेता
येणार आहे.

16 रोजी होणार मतदान
निवडणुका लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप 7 फेब्रुवारीला दुपारी 3.30 नंतर. तर जेथे अपील आहे तेथे 10 फेब्रुवारीला दुपारी 3.30 वाजेनंतर निशाणी वाटप होईल. मतदान केंद्राची यादी 10 फेब्रुवारीला केली जाईल तर मतदान 16 फेब्रुवारीला सकाळी 7.30ते 5.30पर्यंत होईल. 23 फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे.