निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा ‘मुकुधदम’ फॉर्म्युला घेतोय जन्म!

0

मुस्लीम, कुणबी, धनगर, दलित आणि मराठा मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न

मुंबई (राजा आदाटे) । आगामी निवडणुकांचे वारे देशभरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने राजकीय जुळवाजुळवींना सुरूवात झाली असून, त्यात भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरही मागे राहिलेले नाहीत. एका बाजूला भाजप मित्रपक्ष तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस आघाडी असल्याने तिसरा समर्थ पर्याय डाव्या पुरोगामी संघटनांना घेवून उभा करण्याचा अ‍ॅड. आंबेडकर यांचा मानस आहे. त्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी ‘मुकुधदम’(मुस्लीम, कुणबी, धनगर, दलित, मराठा) हा फॉर्म्युला जन्माला घालण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत.

बारामतीत धनगर आरक्षणासाठी एल्गार
अ‍ॅड. आंबेडकर यांनी मुंडे-महाजन यांच्या धर्तीवर हा फॉर्म्युला आखला आहे. 1995 च्या निवडणुकीत त्यांनी ‘माधवम’ म्हणजे माळी, धनगर, वंजारी आणि मराठा समाजाची मोट बांधली होती. तेव्हा महाराष्ट्रात सत्तांतर झाले होते. त्याच धर्तीवर मुस्लीम, कुणबी, धनगर, दलित आणि मराठा समाजाला एकत्रित आणण्यचा त्यांचा प्रयत्न आहे. मुस्लीम आणि कुणबी समाज त्यांच्याबरोबर आधिपासूनच आहे. त्यांनी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच धनगर समाजाला न्याय मिळावा म्हणून त्यांनी धनगर आरक्षण मागणी परिषद बोलावली आहे.

धनगर मतांचे ध्रूवीकरण
धनगर आरक्षणाच्या मागणी परिषदेसाठी त्यांनी बारामतीची जागा निवडली आहे. महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या संख्येने असून, गेल्या निवडणुकीत धनगर आरक्षणाच्या मुद्द्यानेच या मतांचे ध्रूवीकरण झाले आणि त्याचा फायदा महादेव जानकर आणि भाजप आघाडीला झाला होता. परंतु, पंतप्रधान मोदींची टर्म संपत आली तरी आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवल्यामुळे हा समाज कमालीचा संतापला आहे. आता या समाजाचा जसा काँग्रेसवरून विश्वास उडाला होता, तसा भाजपवरूनही उडत चालला आहे. जानकरांची हवा ओसरली आहे. त्याचा राजकीय फायदा अ‍ॅड. आंबेडकरांना होवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.