निवडणुकीसाठी लागणार्‍या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची तपासणी

0

चाळीसगाव । 16 फेब्रुवारी 2017 रोजी होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची तपासणी दि 10 फेब्रुवारी 2017 रोजी चाळीसगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कैलास देवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती ची निवडणूक चाळीसगाव तालुक्यात होणार आहे. त्यासाठी महसूल यंत्रणा सज्ज झाली असून या निवडणुकीत मतदान करण्यासाठी वापरण्यात येणारे 650 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व्यवस्थित काम करतात कि नाही याची तपासणी आज 10 रोजी जवळपास 100 वर अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली. हि यंत्रे यापूर्वी वापरली गेली असल्याने त्यामध्ये असलेला मागील डेटा काढून टाकण्यात आला. यासाठी सकाळी 9 वाजेपासून तहसील कार्यालय आवारात मंडप टाकून कामकाज सुरु झाले होते. हे काम रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास देवरे यांनी दिली. जी यंत्रे तपासली आहेत त्या यंत्रांवर दि 12 फेब्रुवारी रोजी गट निहाय व गण निहाय मतपत्रिका लावून मतदान यंत्रे सील बंद करून मतदानासाठी सज्ज होणार आहेत. दि 15 फेब्रुवारी रोजी या साहित्यांची वाटप येथील राष्ट्रीय विद्यालय येथे होणार आहे.