निवडणूका आणि रामाचा धावा!

0

निवडणुका तोंडावर आहेत. साडेचार वर्षांचा कारभार झाला आहे. मतदारांना काम दाखवायचे काय? केंद्र आणि राज्य शासनासमोर भलेमोठे प्रश्‍नचिन्ह आहे. खरेच आहे ते. नोटबंदी, डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया, इंधन दरवाढ, आरक्षण, विचारवंतांचे बळी, दलित-मुस्लिमांवर हल्ले, मंदिरांमध्ये महिलांना नाकारलेले प्रवेश, बांधकामांची नियमिती, उद्योगधंद्यांची लागलेली वाट की बेरोजगारीचे तांडे…कोणत्या तोंडाने सरकार घरोघरी जाणार. मात्र, आता सरकारला ही चिंता करायची कोणतीही गरज नाही. कारण त्यांच्या मदतीला हिंदुत्ववादी संघटना आणि त्या विचारसरणीचे पक्ष धावून आले आहेत आणि यातूनच पुन्हा जय श्रीराम आणि मंदिर याचा उमाळा आला आहे.

मराठी माणूस हाच बाणा घेवून जन्माला आलेल्या, वाढलेल्या, पसरलेल्या शिवसेना आणि पक्षाने अचानक राम मंदिर झालेच पाहिजे असा पवित्रा घेवून अयोध्या नगरीत डंका पिटला. याचा आवाज देशभरात घुमला. एका प्रादेशिक पक्षाचा गवगवा केवळ देशातच नव्हे तर जगात झाला. याला कारण होता मिडिया. पत्रकार, कॅमेरामन, ओबी व्हॅन आणि त्यांच्यासोबत राबणारे पाचसहा लोक. थेट प्रक्षेपण. जगातले सगळे प्रश्‍न संपले. मंदिर उभारणीत आपलीही वीट लागली पाहिजे अशाच भक्तीभावाने त्यांचे कार्य सुरू होते. मागील निवडणुकीपूर्वी अण्णा हजारे यांनाही जगभरात असेच पोहोचविले होते. जणूकाही या विश्‍वाची निर्मिती करणाराच पृथ्वीतलावर अवतरला असून जगाच्या कल्याणासाठी तो उपोषणाला बसला आहे. भारतीय लोक खरेच भाबडे. त्यांनीही लगेच ठिकठिकाणी घंटानाद काय सुरू केले, रोजगार बुडवून आंदोलनासाठी चौकाचौकात काय बसले, पदरच्या खर्चाचे पेट्रोल टाकून रस्त्यारस्त्यावरून फेर्‍या काय काढल्या… जनता भुलली. काँग्रेसचे सरकार नालायक ठरले.

भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली. काय झाले पुढे? कोण आले निवडून? कोणाला मिळाली मंत्रीपदे? सगळा मिडिया ट्रायल! जीव जाईपर्यंत अण्णांना उपोषणाला बसविले. त्यांना स्वत:लाही वाटू लागले, आपणच या देशाचा तारणहार. आता अण्णा कोठे आहेत? त्यांचा लोकपाल कोठे आहे? निवडणुका जिंकल्या. संपले काम! आश्‍वासने गेली चुलीत. 1991 सालीही बाबरी मस्जिदच्यावेळीही असेच झाले. पाडली. सरकार आले. संपले काम! आता 2019 साली निवडणुकीला सामोरे जाताना हेच वांदे झाले आहेत. मतदाराला भुलवायचे कसे? लगेच विचारमंथन सुरू. नोटबंदीपासून सगळ्या विषयावर फुली मारून झाली.

गांधी घराण्यावर चिखल उडवून झाला; पण हाती काही लागत नाही. मग करायचे काय? तर स्वत:सह जनतेच्याही विस्मरणात गेलेले राम मंदिर याविषयावर टीक मार्क केले. सर्वांचे एकमत झाले. आणि ठरले भाजपने सरकार म्हणून या विषयात अजिबात भाग घ्यायचा नाही. निवडणुक जिंकायचे काम साधू-संत-महंत, विविध हिंदुत्ववादी संघटना, पक्ष आणि या विचारसरणीचे लोक यांच्या शिरावर राहिल. याचाच एक भाग म्हणून अयोध्येत जत्रा भरविण्याचे काम सुरू झाले. यातूनच शिवसेनाही तिकडे पोहोचली. लोकांना अचंबा याचा आहे की, राम मंदिराचा आणि यांचा संबंध काय? आणि तो स्वाभाविक आहे. मराठी माणूस, लुंगी हटाव-पुंगी बजाव, मुंबई महाराष्ट्राचीच, सरकारी नोकर्‍या मराठी तरुणांनाच…या वळणावरून थेट एकदम अयोध्या गाठली. शिवसेना याचा संबध जोडते ते बाबरी मस्जिद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या उद्गारांविषयी. ते असे म्हणाले होते की, बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. हाच धागा पकडून अयोध्येच्या दिशेने विमानोड्डण झाले. आता प्रश्‍न हा आहे की, शिवसेनेलाही आत्ताच राम का आठवला. याची कारणे अगदी साधी, सोपी आणि सरळ आहेत. भले काही मुद्द्यांवरून भाजपवर ते सतत आरोपांची राळ उडवत असले तरी, केंद्रात व राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. मंत्रीपदे भोगताहेत. राजीनामा देण्याचा पवित्रा चार पावसाळ्यांत भिजून गेला आणि चार हिवाळ्यात थिजून गेला. मग मतदारांना आणि तमाम सैनिकांना दाखवायचे काय? कारण सत्तेत राहता तरीही विरोध करता हे लोकांच्या पचनी पडणारे नाही.

सत्तेत राहूनही विरोध याला हिम्मत मानत असला तरी विविध खात्यांचे मंत्री, महामंडळावरील पदाधिकारी यांच्या कामाचा लेखाजोखा कोठे आहे? यातूनच आधी मंदिर, नंतर सरकार असा नारा देण्यात आला. यासाठी मुंबईत जोरदार वातावरण निर्माण केले. नंतर गाजावाजा करत रेल्वे, बस, मोटारी भरभरून अयोध्येला गेल्या. तेथेही सभा मंडपासाठी भूमीपूजन केले. नंतर तिथून उद्धव ठाकरे यांनी सरकारला दम भरला. आणि सभा संपवून त्यांचे विमान मुंबईत उतरेपर्यंत मुख्यमंत्री म्हणाले, त्यांना राम पावणार! मुद्दा असा आहे की, भाजप पुन्हा सत्तेत यावे, आपल्यालाही वाटा मिळावा अशीच शिवसेनेची इच्छा आहे. यातूनच त्यांना मराठा-धनगर-मुस्लिम आरक्षण, मुंबईतून हद्दपार होत असलेला मराठी माणूस, बुलेट ट्रेन, परप्रांतियांचे लोंढे, रेडझोन, अनधिकृत बांधकांमांचे नियमितीकरण, शेतकर्‍यांची कर्जमाफी, दुष्काळाचे संकट, मुली-महिलांवरील अत्याचारांची संख्या, वाढती गुन्हेगारी, देशावर दहशतवादी संघटनांचे हल्ले, सीमेवर दररोज शहीद होणारे सैनिक…अशा अनेक मुद्द्यांना तिलांजली दिली. आणि एकदम हिंदुत्वांच्या एकत्रीकरणासाठी मंदिर आणले गेले.

हिंदुत्वाबाबत शिवसेनेची भूमिका भाजपच्या तुलनेत मवाळ आहे. तरीही ते आता मंदिरासाठी सरसावले आहेत. जणूकाही राम मंदिराची कल्पना भाजपाची नाही, तर शिवसेनेचीच आहे. आता एवढे करूनही एका रात्रीत मंदिर काही उभा राहणार नाही, स्पष्ट आहे. अजून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी आहे. तरीही आवेश असा की, तुम्हाला जमत नसेल तर तसे सांगा आम्ही ते बांधू. अरे व्वा! हे सगळे साटेलोटे दिसत आहे. जानेवारी 2001साली जन्मून 2019च्या निवडणुकीत मतदानास पात्र ठरलेल्या नव मतदारांना रामजन्मभूमी, बाबरी मशिद हा इतिहास माहित नाही. कारण या वयाच्या व त्यापुढील वयाच्या तरुणांसमोर करीअर आणि जीवनाचे अनेक प्रश्‍न समोर आहेत. त्यांच्यासमोर मोठा संघर्ष आहे. साहजिकच भावनिक मुद्द्यावर निवडणुका जिंकण्यासाठी राम उपयोगी ठरेल, अशी स्थिती नाही. तरीही साडेचार वर्षाच्या कारभारात उणे बाजू जादा आहे. यातूनच निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीर रामाचा धावा सुरू केला आहे.