धुळे- धुळे शहरापासून 20 किमी अंतरावर सोनगीर गाव आहे. यागावातून धुळे महापालिकेची तापी पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन जाते. सोनगीरला गावाला पाणी पुरवठा करणारे जामफळ धरण कोरडेखट पडले आहे. त्यामुळे जामफळ धरणात महापालिकेने रॉवॉटर सोडावे अशी मागणी करीत सोनगीर ग्रामस्थांनी गुरुवारी केली. निवडणूकीनंतर सोनगीरचा पाणी प्रश्न सोडवू अशी सुचना आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिल्या आहेत.
सोनगिर गावाला जामफळ धरणातून पाणी पुरवठा होतो. यंदा पावसाने दांडी मारल्याने सोनगीर येथील जनतेला पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. गावाची लोकसंख्या 30 ते 40 हजार आहे. गावातून धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी तापी पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी जाते. त्यातून जामफळ धरणात चार दिवस रॉ-वॉटर पाणी सोडावे अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली आहे. त्यामुळे सोनगीर येथील पाणी प्रश्न सोडविण्यास मदत होईल. अशी मागणी करण्यात आली आहे.
आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले की, धुळे महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. तापी पाणी पुरवठा योजनेत सोनगीर गावाने सहभागी होणे आवश्यक होते. ते त्यापासून लांब राहिले. तापी पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून धुळे शहराला पाणी पुरवठा केला जातो. धुळ्याला पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसाला 7 ते 8 लाख रुपये खर्च आहे. सोनगीर गावाला पाणी पुरवठा करतांना धुळ्यातील पाणी पुरवठा खंडीत करावा लागतो. ऐन निवडणूकीच्या काळात तसे केले तर त्याचा परिणाम वेगळा होईल. गावातील नागरिकांनी तापी पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन तोडू नये. निवडणूकीनंतर हा प्रश्न सोडवू अशी माहिती आयुक्तांनी दिली. यावेळी सोनगीर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता अविनाश महाजन, उपसंरपच धनंजय कासार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.