निवडणूकीसाठी 780 जणांचे पथक

0

भुसावळ । आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक असल्यामुळे शिक्षकांना पांडूरंग टॉकीज येथे प्रात्यक्षिक प्रशिक्षण रविवार 5 रोजी देण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिनाक्षी राठोड यांनी एव्हीएम मशिन कशी जोडणी करावी या संदर्भात कर्मचार्‍यांना प्रात्यक्षिक करुन दाखविले. कशा पध्दतीने नागरिकांकडून मतदान करुन घ्यावे याची सुध्दा माहिती देण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत 130 पथक कार्यरत करण्यात आले आहे. या पथकात प्रत्येकी सहा कर्मचार्‍यांचा समावेश राहील. असे एकूण 780 कर्मचार्‍यांची निवडणूकीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांना निवडणूक संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये चार निवडणूक निरीक्षकांवर एक केंद्राध्यक्ष अशी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये समन्वय गरजेचा
मतदान केद्रात एकावेळी केवळ 4 ते 5 मतदारांनाच कक्षात प्रवेश द्यावा, प्रत्येक कक्षासाठी एक पोलीस कर्मचारी असून त्यांनी पुरूष व महिला अशा दोन स्वतंत्र रांगा करुन अपंग किंवा जेष्ठ मतदारांना रांगेत उभे न करता थेट प्रवेश द्यावा. मतदारांशी सौजन्याने वागून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये समन्वय गरजेचा असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार मिनाक्षी राठोड यांनी सांगितले.

प्रात्याक्षिकाद्वारे माहिती
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार मिनाक्षी राठोड, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, नायब तहसिलदार पी.बी. मोरे, संजय तायडे, एस.एस. निकम, नायब तहसिलदार निकम उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात पावर पॉईंट प्रेझेंटेशनव्दारे स्क्रीनवर संपूर्ण प्रात्याक्षिके दाखवून मुद्देनिहाय सर्व प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगतांना मतदान सुरु होण्यापूर्वीची तयारी, मतदान केंद्राची उभारणी, मतदान केंद्राची रचना या विषयी माहिती दिली.

तसेच मतदान सुरु झाल्यापासून दर दोन तासाची आकडेवारी ही आपआपल्या क्षेत्रीय अधिकार्‍यांना कळविण्यात यावी. मतदानाच्या दिवशी काही तांत्रिक अडचणी आल्यास तात्काळ संपर्क साधावा, असेही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राठोड यांनी सांगितले. प्रशिक्षण वर्गाच्या दुपारच्या सत्रात सर्व उपस्थित केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र प्रत्यक्ष हाताळून येणार्‍या अडचणींचे निराकरण करण्यात आले.

मतदारांची ओळख पटवावी
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राठोड यांनी सांगितले की, मतदान कक्षातील गुप्तता पाळणे हे कायद्याने बंधनकारक असून कसूर करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल. मतदारांची ओळख पटविण्यासाठी आयोगाने ठरवून दिलेल्या 11 पुराव्यापैकी एक पुरावा काळजीपूर्वक तपासावा व बोगस मतदान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर दिलेल्या सर्व नमुन्यातील अहवाल अचुकपणे भरण्याची जबाबदारी केंद्राध्यक्षांची असून ती व्यवस्थीतपणे पार पाडण्याचे आवाहन केले.