नवी दिल्ली:प्राप्तिकर विभागाने ऐन लोकसभा निवडणुकी तोंडावर मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात छापेमारी केली आहे. भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या काळात हे छापे टाकले जात आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. यावरून निवडणूक आयोगाने आयकर विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांकडे छापा टाकायचा असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना याची पूर्वसूचना द्या, अशा शब्दात आयोगाने अधिकाऱ्यांना सांगितले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या काळात हे छापे टाकले जात आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर आयोगाने या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. निवडणुकीच्या काळात कुठेही छापा टाकायचा असेल तर त्याआधी निवडणूक आयोगाला याची पूर्वसूचना देणे गरजेचे आहे, असे आयोगाने म्हटले आहे.
मध्य प्रदेशात जी छापेमारी करण्यात आली त्यासंबंधीची सूचना प्राप्तीकर विभागाने निवडणूक आयोगाला दिली नव्हती. देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे आयोगाला छाप्यासंबंधी माहिती असणे गरजेचे आहे, असेही आयोगाने म्हटले आहे. ‘निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राप्तिकर खात्याचे सुरू असलेले छापे राजकीयदृष्ट्या निष्पक्ष असतील आणि गैरप्रकार रोखण्यासाठी छापे सुरूच ठेवले जातील,’ अशी ग्वाही महसूल सचिव, तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने निवडणूक आयोगाला दिली आहे.