निवडणूक कर्मचार्‍यांना सुविधांसाठी शिष्टमंडळाचे प्रांताधिकार्‍यांना साकडे

0

असुविधांमुळे निवडणूक कर्मचारी धास्तावले ; दोघांच्या मृत्यूने हळहळ

भुसावळ- आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कर्मचार्‍यांचे दुसरे प्रशिक्षण नुकतेच दोन दिवस दोन सत्रांमध्ये तालुक्यात झाले मात्र या ठिकाणी मिळालेल्या असुविधा व जामनेर तालुक्यात घेतलेल्या बँक अकाउंट नंबर यामुळे कर्मचारी धास्तावले असून दोन दिवसांमध्ये दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे यामुळे मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात शिक्षक संघटनेतर्फे शिष्टमंडळ प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना साकडे घालण्यात आले.

निवडणूक कर्मचारी झाले अस्वस्थ
निवडणूक प्रक्रियेमध्ये झालेला बदल यामुळे प्रशासनाच्या वतीने काळजीपूर्वक प्रशिक्षण वर्ग घेण्यावर भर दिला जात आहे. पहिला प्रशिक्षण वर्ग कर्मचारी ज्या तालुके होते त्याच ठिकाणी झाले तर दुसरे वर्ग कर्मचार्‍यांना ज्या तालुक्यामध्ये काम करावयाचे आहे तेथे दोन दिवस झाले. दोन सत्रात झालेल्या या वर्गात बॅलेट युनिट व्हीव्हीपॅट यंत्र व कंट्रोल युनिट याबाबतची माहिती देऊन विविध संविधानिक लिफाफे, सील करावयाचे मोहर, विविध फॉर्म याची माहिती देण्यात आली. दुसर्‍या सत्रात प्रत्यक्ष यंत्र हाताळणी याबाबतची माहिती देण्यात आली. प्रचंड उन्हाळ्यामुळे परतीच्या प्रवासामध्ये कर्मचार्‍यांना त्रास होऊन जामनेर येथील एक तर अमळनेरातील दुसर्‍या शिक्षकाचा हृदयविकाराच्या मृत्यू झाला. या घटनेमुळे कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. मतदान केंद्रावरदेखील पंखे अथवा कुलरची व्यवस्था नसल्याने भुसावळ तालुक्यातील शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेऊन समस्या सोडवण्याची मागणी केली.

असुविधांमुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजी
कर्मचार्‍यांसाठी मतदान केंद्रावर सुविधा असणे आवश्यक आहे मा त्या नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 22 एप्रिल रोजी कर्मचारी सकाळीआठ वाजेपासून नेमून दिलेल्या ठिकाणी साहित्य घेण्यासाठी एकत्र जमतील व तेथून नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचतील मात्र रात्री झोपण्यासाठी सुविधा नसताना पुन्हा कर्मचार्‍यांना दुसर्‍या दिवशी पहाटे चार ते सायंकाळी सहा पर्यंत सलग काम करावे लागणार आहे. त्यानंतर साहित्य जमा करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागणार आहे याचा परिणाम कर्मचार्‍यांच्या आरोग्यावर निश्चित होणार आहे.

जामनेरात बँक अकाउंट नंबर घेतल्याने नाराजी
गत निवडणुकीचा अनुभव घेता या ठिकाणी कर्मचार्‍यांचे मानधन कमी देण्यात आले होते व त्या लोकांनी ओरड केल्यानंतर हे पैसे पुन्हा देण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात बँक अकाउंट नंबर व आयएफसी कोड घेतला गेलेला मात्र जामनेर तालुक्यात बँक अकाउंट नंबर घेतल्याने पुन्हा कर्मचारी मानधन कमी देतील, अशी भीती कर्मचार्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.

कर्मचार्‍यांना उर्मट वागणूक
निवडणूककामी नियुक्त केलेले बरेचसे कर्मचारी 40 ते 55 वयोगटातील असून या कर्मचार्‍यांना विविध आजारांनी ग्रासले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे याबाबत अर्ज केला असता निवडणूक अधिनियम 134 प्रमाणे कारवाई करण्याचा धाक दाखविला जात असल्याचा आरोप आहे तर अधिकारी या कर्मचार्‍यांना उर्मटपणे बोलत असून त्यांच्या भावना समजून घेत नाहीत तसेच अधिकाराचा गैरवापर करीत असल्याने दोन शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप आहे. दरम्यान, विविध समस्यांबाबत भुसावळ तालुक्यातील मागासवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, एस.एस.अहिरे, डी.पी.साळुंखे, आर.एस.अडकमोल, एस.के.भटकर, ए.आर.धनपाल, वाय.एन.झोपे, शरद पाटील, प्रा.ए.एम.निकम, जे.पी.सपकाळे, प्रदीप साखरे, सुनील वानखेडे, तुकाराम सोनवणे, गिरीश नेमाडे, प्रा.जतीन मेढे आदींनी प्रांताधिकार्‍यांची भेट घेऊन समस्या सोडवण्याबाबत साकडे घातले.