मुंबई । निवडणूक कामासाठी गेलेले मुंबई महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी वर्षभरानंतरही सेवेत परतलेले नाहीत. या कर्मचार्यांनी पालिका सेवेत रुजू व्हावे, यासाठी परिपत्रक काढण्याची वेळ पालिकेवर आली आहे. यात 1 फेब्रुवारीपासून कर्माचारी व अधिकारी हजर न राहिल्यास त्यांचे वेतन बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. केंद्र सरकारने मतदारांच्या याद्या अद्यावत करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले होते. मुंबई शहर, उपनगरातील 36 विधानसभा मतदार संघातील याद्यांचे पुनरिक्षण करण्यात येणार होते. 3 ऑक्टोबर 2017 ते 30 नोव्हेंबरपर्यंत कालावधी दिला होता.
1 हजार 698 कर्मचारी गेले होते
पालिकेच्या विविध खात्यातून अभियंता, शिक्षक, टेक्निशियन, अधिकारीवर्ग असे 1 हजार 698 कर्मचार्यांना पाठविण्यात आले होते. परंतु, नियोजित वेळेते हे काम पुर्ण न झाल्याने 15 डिसेंबर 2017 पर्यंतची मुदतवाढ दिली. दरम्यान, निवडणुकीच्या कामात पालिकेचे कर्मचारी व्यस्त असल्याने महत्त्वाच्या खात्यांचे कामकाज रखडले होते. मात्र निवडणूक हे राष्ट्रीय काम असल्याने पालिकेने निमूटपणे आपला कर्मचारीवर्ग खात्यातून दिला होता. मात्र निवडणुकीच्या कामाला दिलेली मुदतवाढ संपली असून महिना उलटून गेला तरी कर्मचारी व अधिकारी अद्याप परतलेले नाहीत.
…तर वेतन बंद करणार
विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी पाठवलेले कर्मचारी वर्षभरानंतरही पालिका सेवेत रुजू झालेले नाहीत. याचा फटका प्रामुख्याने आरोग्य खाते, मालमत्ता कर, पर्जन्य जलवाहिन्या आदी विभागांच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. त्यामुळे निवडणुकीचे काम संपले असल्यास सर्व पालिका कर्मचार्यांना निवडणूक कामातून मोकळे करावे, अशी मागणी पालिका प्रशासनाने शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परिपत्रकाद्वारे केली आहे. यात निवडणूक कर्तव्यावर पाठविलेल्या सर्व कर्मचार्यांना 31 जानेवारी 2018 पर्यंत परत बोलावून घ्यावे. जे कर्मचारी मुदतीच्या वेळेत हजर राहणार नाहीत, त्यांचे वेतन बंद केले जाईल, अशा सूचना केल्या आहेत.