निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

0

जळगावसाठी गोडेसी तर रावेरसाठी के.शंकर गणेश

जळगाव – लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब तपासण्यासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव लोकसभेसाठी वेणोधर गोडेसी, रावेर मतदारसंघासाठी के. शंकर गणेश यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती रावेरचे निवडणूक निर्णयाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांकडुन निवडणुकीचा खर्च सादर केला जातो. या खर्चाची तपासणी निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे. तसेच मतदान केंद्रांवर दिव्यांग बांधवांना सुविधा पुरविण्यासाठी विभागीय आयुक्त राजाराम माने यांची निरीक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.
३ लाख मतदारांमध्ये जनजागृती
व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे मतदानाची खात्री पटवुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती मोहीम सुरू आहे. पहील्या टप्प्याची मोहीम पुर्ण झाली असुन दुसर्‍या टप्प्यात ७५५ गावांमध्ये जनजागृती करण्यात आली असुन आत्तापर्यंत ३ लाखाहून अधिक मतदारांपर्यंत ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.
वाहनांना जीपीएस यंत्रणा
मतदान यंत्रे वाहुन नेणार्‍या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच अत्यंत काटेकोर पध्दतीने नियोजन केले जात आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे मतदान यंत्रे वाहुन नेणार्‍या वाहनाचे लोकेशन यामुळे कळणार आहे.
सुरक्षा दलातील व्यक्तींचे छायाचित्र वापरावर निर्बंध
लोकसभा निवडणूकीत उमेवारांनी किंवा राजकीय पक्षांनी जाहिराती करतांना सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करण्यावर निर्बंध घातले आहे. याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या प्रधान सचिवांनी उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी जाहिराती करतांना सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करण्यापासून परावृत्त होण्याबाबत समुपदेशन जारी केले आहे, असे सहाय्यक आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा नायब तहसिलदार रविंद्र मोरे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.