जळगाव (युवराज परदेशी) – येणार्या विधानसभेची रंगीत तालीम मानल्या जाणार्या व मुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्र्यांसह दोन कॅबिनेट मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या धुळे महापालिका निवडणुकीत सर्व राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकवत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली. याचे श्रेय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनाच जाते, कारण भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी उभे केलेले आव्हान, काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेने लावलेली ताकद या पार्श्वभूमीवर भाजपाची वाट खडतर मानली जात होती. याचवेळी महाजन यांना धुळ्यासह स्वत:च्या मतदार संघातील शेंदुर्णी नगरपंचायतीमध्येही भाजपाचा गड राखायचा होता यामुळे त्यांची दुहेरी कसरत होती. अशा परिस्थितीत त्यांनी निवडणूक जिंकण्याचा महाजन पॅटर्न यशस्वी करुन दाखवला.
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी म्हणून गिरीश महाजन ओळखले जातात. कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन केल्यानंतर त्यांचे मॅनेजमेंट कसे चालते हे आयआयटी व आयआयएम सारख्या संस्थासह परदेशातील विद्यापीठानांना पडलेले कोडे आहे. याच यशस्वी मॅनेजमेंटच्या जोरावर त्यांनी नाशिक महापालिकेत भाजपाला एकहाती सत्ता मिळवून दिली. त्यास सुरुवातीला भाजपाची लाट म्हटले गेलेे मात्र त्यानंतर मुख्यंमत्र्यांनी त्यांच्याकडे जळगाव व आता धुळे महापालिकेची जबाबदारी सोपवली. या दोन्ही ठिकाणी भाजपाची ताकद अत्यल्प होती. प्रमु
ख विरोधीपक्ष म्हणून देखील भाजपाला कोणी भाव देण्यास तयार नव्हते, अशा वेळी फिफ्टीप्लसचा नारा देत एकहाती सत्ता मिळवण्याचा नारा म्हणजे हास्यास्पद ठरला मात्र जळगावसह धुळे महापालिकेतही त्यांनी भाजपाला एकहाती सत्ता मिळवून दिली. या दोन्ही महापालिकांमध्ये त्यांना मातब्बर नेत्यांचे आव्हान होते. जळगावला माजी मंत्री सुरेश जैन तर धुळ्याला स्वपक्षाचे बंडखोर नेते आमदार अनिल गोटे यांचे चक्रव्ह्यूव भेदणे सोपे नव्हते मात्र महाजन यांनी हे शिवधणुष्य लिलया पेलले. त्याआधी त्यांनी होमपीच असणार्या जामनेर नगरपालिकेत सर्व जागा निवडणून आणत विरोधकांचा धुव्वा उडवला असल्याने शेंदूर्णी नगरपंचायतीमध्ये त्यांनाच यश मिळेल, हे निश्चित मानले जात होते केवळ किती जागा मिळतात याची सर्वांना उत्सुकता लागून होती. नाशिक व जळगाव पेक्षा धुळ्याची निवडणूक मोठी आव्हानात्मक होती, यास अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे भाजपाचे स्थानिक आमदार अनिल गोटे यांचा आक्रमक स्वभाव! गोटे हे अभ्यासू व आक्रमक अशी दुधारी तलवार असल्याने सुरुवातील मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसल्यानंतर निवडणुकिची सर्व सुत्रे महाजन यांनी सांभाळली. त्यांच्या सोबतील केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे देखील धुळ्यात तळ ठोकून होते मात्र गोटे त्यांना जुमानणार नाही, याची कल्पना भाजपश्रेष्टींना आधीपासून असल्याने निवडणुकीची धुरा महाजन यांच्या हाती सोपविण्यात आली. गोटे हे स्थानिक असल्याने त्यांना धुळेकरांच्या अडचणी व अपेक्षा यांची माहिती होतीच त्या दृष्टीने त्यांनी निवडणुकीच्या किमान चार ते पाच महिन्यांपासून तयारी सुरु केली होती. मात्र त्यांचा भामरे, रावल व महाजन या त्रिकुटाला विरोध होता. महाजन यांनी पार्टी विथ डिफरन्सचा मुखवटा काढून ठेवत जळगावप्रमाणे अन्यपक्षातील विजयी होऊ शकणार्या उमेदवारांना आयात करत भाजपातर्फे तिकीट दिले. येथूनच गोटे विरुध्द भाजपा सामना रंगालयला सुरुवात झाली. यात गोटेंनी केलेला आक्रास्ताळेपणा धुळेकरांना रुचला नाही. यासह शिवसेनेच्या उमेदवारांना जाहीर केलेला पाठिंबा, राष्ट्रवादीशी जुळवून घेतलेली नाळ व स्वत:ची प्रतिमा या चक्रात गोटे अडकले व पुर्णपणे अपयशी ठरले. दुसरीकडे भाजपाने गोटेंच्या टिकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा विकासच्या व्हिजनवर भर दिला. जळगाव महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपाने 100 कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी देण्याचे आश्वासन जळगावकरांना दिले होते. तो शब्द पाळत मुख्यमंत्र्यांनी निधीची घोषणा केली व त्यावर काम देखील सुरु झाले, विकासाचे हेच व्हिजन धुळेकरांना पटवून देण्यात महाजन यशस्वी झाले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी वॉर्ड आणि बूथनिहाय यंत्रणा समर्थपणे सांभाळली गोटेंना डॉ.भामरेंनी प्रतिउत्तरे दिल्याने गोटे विरुध्द भामरे सामना रंगला व त्यातच महाजनांनी डाव साधला, असे म्हटल्यास चुकिचे ठरणार नाही. भाजप व गोटेंच्या भांडणात आपला फायदा होईल, असे स्वप्न पाहणार्या राष्ट्रवादीने गत दहा वर्षांपासून हातात असलेली महापालिकेतील सत्ता गमावली आहे. धुळ्यातील विजयामुळे मतदारांनी भाजपावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. यामुळे गिरीश महाजन यांच्या नावाने ओळखल्या जाणार्या महाजन पॅटर्न पुन्हा एकदा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.